जगातील सर्वात मोठा धर्म म्हणून आज ख्रिश्चन धर्माकडे (Christianity) पहिले जाते. आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी व्हॅटीकन (Vatican)ने जगभरात आपले अनुयायी पाठवले. ख्रिश्चन धर्माचे रक्षण करणे, हा धर्म पुढे चालवणे, लोकांना येशूचा संदेश देणे अशी धर्माशी संबंधित कामे करणारे लोक प्रिस्ट, फादर अथवा धर्मगुरू म्हणून ओळखले जाऊ लागले. लग्न, शारीरिक संबंध अशा ऐहिक गोष्टींचा त्याग करून हे धर्मगुरू स्वतःचे जीवन चर्चला समर्पित करतात. मात्र अशा पवित्र चर्चमध्ये चक्क लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. हे करणारे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क धर्मगुरू आहेत हे पाहून हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अशा प्रकारच्या वाढत्या घटना पाहता, पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी व्हॅटिकनमध्ये बाल लैंगिक अत्याचाराचा सामना करण्यासाठी गुरुवारी एका ऐतिहासिक परिषदेला सुरुवात केली. यामध्ये अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी काही ठोस वापले उचलली जाणार आहेत. यासाठी जगभरातील महत्वाच्या 114 बिशपना एक प्रकारचे ट्रेनिंग देण्यात येणार आहेत. या परिषदेच्या संयोजकांमध्ये मुंबईच्या ग्रॅशिअस ओसवाल्ड (Oswald Gracias) यांचा समावेश आहे. या परिषदेमध्ये बोलताना यांनी त्यांच्याकडे आलेले लैंगिक शोषणाचे प्रकरण अधिक योग्य पद्धतीने हाताळता आले असते, अशी कबुली दिली आहे. मुंबईचे आर्चबिशप असलेल्या ओसवाल्ड यांनी बाल लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणी वेळेवर कारवाई केली नाही तसेच आरोपांसंदर्भात पोलिसांना कल्पना दिली नाही. (हेही वाचा: लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास आता होणार मृत्युंदड)
याचसंदर्भातील मागच्या वर्षीची एक घटना आठवते, ज्यामध्ये एका एचआयव्ही बाधील धर्मगुरूने तब्बल 30 लहान मुलींवर लैगिक अत्याचार केले होते. मात्र चर्चने या धर्मगुरूला माफ करून पुन्हा त्याचा स्वीकार केला होता. एटॉल्फो गार्सिया (Ataulfo Garcia) असे या प्रिस्टचे नाव असून त्यांनी मेक्सिको येथे 5 ते 10 वयोगटातील तब्बल 30 पेक्षा जास्त मुलींवर बलात्कार केला होता. याबाबतील कोणत्याही संघटनेने अथवा देशाने मुलींच्या अधिकाराबद्दला आवाज उठवला नाही. रोमन कॅथलिक चर्चचा पगडा मेक्सिको देशात इतका आहे की, या घटनेविरोधात बोलायला कोणीही पुढे आले नाही आणि या प्रिस्टला पूर्णतः माफ करण्यात आले. यापैकी फक्त 2 मुलींच्या पालकांनी याबाबत तक्रार करायची असे ठरवले. त्यापैकी एका मुलीच्या आईने पोपला पत्र लिहून आपल्याला बोलायचे असल्याचे सांगितले. मात्र चर्चने हा मुद्दा आता पूर्णतः बंद करण्यात आल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला.
मागच्या वर्षीच बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कॅथलिक चर्चमधील 300 हून अधिक पाद्रींनी गेल्या 70 वर्षांमध्ये एक हजारहून अधिक लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. अत्याचार करणाऱ्या 100 पाद्रींचा आता मृत्यू झाला आहे. काही पाद्री निवृत्त झाले आहेत तर काही पाद्री आता सक्तीच्या रजेवर असल्याचे अहवालात म्हटले होते. रोमन कॅथलिक चर्चचा अशा प्रकारे लैंगिक अत्याचार करण्याचा फार मोठा इतिहास आहे. मात्र धर्माच्या नावाखाली अशा प्रकारचे कृत्य चक्क धर्मगुरूंकडून होत आहे हे पाहिल्यावर आता पोप फ्रान्सिस आणि कॅथलिक चर्चने काही ठोस पावले उचलायचे ठरवले आहे. यासाठी अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन केले होते, त्यामुळे आता याबाबत नक्की काय बदल होतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.