भारताचा शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) सध्या अत्यंत गरिबीच्या टप्प्यातून जात आहे. दिवसेंदिवस इथली जनता महागाईने होरपळताना दिसत आहे. देशात 150 रुपये किलोने पीठ विकले जात असताना आता चिकनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पाकिस्तानमध्ये कोंबडीची किंमत 700 ते 800 रुपये किलोवर पोहोचली आहे. रावळपिंडी, इस्लामाबाद आणि लाहोरसह इतर शहरांमध्ये चिकनचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, आतापर्यंत रेशनच्या किमती वाढत होत्या. मात्र आता मांसाच्या किमतीतही वाढ झाली आहे.
ब्रॉयलर चिकनच्या दरात किलोमागे 150 ते 210 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर आता कोंबडीच्या मांसाची किंमत 700-780 पाकिस्तानी रुपये प्रति किलोने विकली जात आहे, जी पूर्वी 620-650 रुपये किलो होती. हाडेविरहित मांसाची किंमत 1,000 रुपयांवरून 1,100 रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. जिवंत कोंबडी 500 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद पडल्याने चिकनच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर 700 रुपये किलोने विकले जाणारे गोमांस आता 900-1000 रुपये झाले आहे. मटण 1,600 ते 1,800 रुपये किलोने विकले जात असून, ते 1,400 रुपयांवरून वाढले आहे.
अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. किरकोळ किमतीबाबत सरकारला अधिसूचना काढावी लागली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कराचीमध्ये चिकनच्या किमतींबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. ज्यामध्ये कोणताही दुकानदार 502 पयांपेक्षा जास्त दराने कोंबडीचे मांस विकणार नाही, असे म्हटले आहे. तर पोल्ट्री फॉर्मसाठी, कोंबडीची किंमत 310 रुपये प्रति किलो असेल. घाऊक किंमत 318 पाकिस्तानी रुपये प्रति किलो ठेवण्यात आली आहे. अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये प्रशासनाला चिकनचे दर निश्चित करावे लागले. (हेही वाचा: Asim Jamil Shot Dead: इस्लामिक विद्वान मौलाना तारिक जमील यांच्या मुलाची पाकिस्तानच्या तालंबा येथे हत्या)
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या खुल्या बाजारात 20 किलो पिठाची पिशवी 2850-3050 रुपये दराने विकली जात आहे. डाळींची किंमत 335 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे. फळांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. संत्री 440 रुपये प्रति डझन, केळी 300 रुपये डझन, डाळिंब 400 रुपये आणि इराणी सफरचंद 340 रुपये किलो दराने विकली जात आहे.