इम्रान खान (Imran Khan) यांच्या हातातून सत्ता गेल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले. शरीफ म्हणाले की, इम्रान खान यांनी दुबईमध्ये 14 कोटी रुपयांच्या तोशाखाना भेटवस्तू विकल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी खुलासा केला की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी तिजोरीतून भेटवस्तू दुबईला नेल्या आणि तेथे त्या 14 कोटी रुपयांना विकल्या.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना हा खळबळजनक खुलासा केला. या भेटवस्तूंमध्ये हिऱ्यांचे दागिने, बांगड्या, घड्याळे आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाबाबत इम्रान खानविरोधात चौकशी सुरू असून ते तुरुंगात जाण्याचा धोका आहे. शेहबाज शरीफ म्हणाले, ‘मी या गोष्टीची पुष्टी करतो की इम्रान खान दुबईला सरकारी तिजोरीतून भेटवस्तू घेऊन गेले होते जिथे त्यांनी त्या 14 कोटी रुपयांना विकल्या.’
यापूर्वी डेक घड्याळ सापडले होते जे कधीकाळी सरकारी तिजोरीत जमा केले होते. यापूर्वी इम्रान खान सरकारने सरकारी तिजोरीतील कोणकोणत्या भेटवस्तू आपल्याजवळ ठेवल्या हे सतत लपवून ठेवले होते. यापूर्वी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने राज्याच्या तिजोरीतील कोट्यवधींचे हार विकल्याप्रकरणी इम्रान खानविरुद्ध तपास सुरू केला होता. या नेकलेसच्या विक्रीमुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
इम्रान खानने हा नेकलेस जुल्फी बुखारी यांच्यामार्फत लाहोरच्या एका ज्वेलर्सला 18 कोटी रुपयांना विकल्याचे सांगितले जात आहे. या पैशातील काही भागच सरकारी तिजोरीत जमा झाला होता. याबाबत झुल्फी बुखारी म्हणाले होते की, नेकलेसबाबत कधीही चर्चा झाली नाही आणि सर्व आरोप निराधार आहेत. (हेही वाचा: सभापतींनी पंतप्रधानांचेच नाव चुकवले, शाहबाज शरीफ यांच्या जागी नवाझ शरीफ यांना पंतप्रधान म्हणून केले घोषित)
दरम्यान, पाकिस्तानी कायद्यानुसार जेव्हा जेव्हा कोणत्याही पंतप्रधानांना दुसऱ्या राज्यातून किंवा देशाकडून भेटवस्तू मिळते तेव्हा ते तोशाखान्याला द्यावे लागते. जर त्यांना भेटवस्तू स्वतःजवळ ठेवायची असेल, तर त्यांना त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल जी लिलावाद्वारे ठरवली जाते. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात साठवल्या जातात किंवा त्यांचा लिलाव केला जाऊ शकतो आणि यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा केला जातो.