टेस्ला (Tesla) संस्थापक आणि एक्सचे (पूर्वीचे ट्विटर) अब्जाधीश मालक एलोन मस्क (Elon Musk) यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Peace Prize) नामांकन देण्यात आले आहे. पॉलिटिकोच्या अहवालानुसार, नॉर्वेचे खासदार मारियस निल्सेन (MP Marius Nilsen) यांनी 2024 च्या नोबेल पुरस्कारासाठी मस्क यांचे नाव पुढे केले आहे. वृत्तानुसार, नॉर्वेच्या लिबर्टेरियन प्रोग्रेस पार्टीचे खासदार मॉरिस निल्सेन यांनी यासाठी एक प्रस्ताव ठेवला आहे आणि त्यात त्यांनी अब्जाधीश व्यावसायिक इलॉन मस्क यांचे कौतुक केले आहे.
ते म्हणाले की, मस्क यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून केवळ जग अधिक चांगले जोडलेच गेले नाही, तर ते अधिक सुरक्षित होण्यासही मदत झाली आहे. इलॉन मस्क यांनी ज्या कंपन्या स्थापन केल्या, चालवल्या आणि सध्या त्यांच्या मालकीच्या आहेत त्या समाजात सुधारणा करत आहेत. ते केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अंतराळातही संपर्क प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम करत आहेत.
स्थानिक वृत्तपत्र ऍग्डरपोस्टनमध्ये आपले नामांकन जाहीर करताना, मॉरिस निल्सन म्हणाले की, ‘या ध्रुवीकृत जगात, एलोन मस्क कोणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्यासाठी त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी देत आहेत. आपल्या प्रस्तावात निल्सेन यांनी इलॉन मस्क यांना नामनिर्देशित करण्याचे कारण दिले असून, ट्विटरचे अधिग्रहण आणि युक्रेनच्या सैन्याला उपग्रह संप्रेषण प्रदान करणे यासारखी मस्कची अलीकडील कामे अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निल्सेन व्यतिरिक्त, नॉर्वेजियन लेफ्ट-विंग रेड पार्टी (Left-Wing Red Party) खासदार सोफी मारहौग यांनी शोध पत्रकार आणि विकिलिक्स वेबसाइटचे संस्थापक ज्युलियन असांज (Julian Assange) यांना देखील नामांकित केले आहे. त्या म्हणाल्या, ‘असांज यांनी पाश्चात्य युद्ध गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. जर आपण युद्ध टाळू इच्छित असाल तर आपल्याला युद्धामुळे होणाऱ्या नुकसानीचे सत्य माहित असले पाहिजे. असांज यांनी युद्धकैद्यांवरील अत्याचार आणि अमानुष वागणूक उघड केली आहे. त्यामुळे ते शांतता पुरस्कारास पात्र आहेत.’ (हेही वाचा: Shashi Tharoor: फ्रान्स सरकारने शशी थरूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान 'फ्रँकोफोन' ने केले सन्मानित)
याशिवाय अमेरिकन काँग्रेस सदस्य क्लॉडिया टेनी यांनी जानेवारीत डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी दिली होती. ट्रम्प यांना मागील वर्षांमध्येही नामांकन मिळाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. नोबेल पुरस्कार दरवर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केला जातो.