Nobel Prize 2018 : लैंगिक अत्याचाराविरोधात कार्य करणारे डॉ. डेनिस  मुकवेगे आणि नादिया मुराद यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल जाहीर
नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी (Photo credits: Twitter)

नोबेल पुरस्कारातील सर्वात महत्वाच्या पुरस्काराची, ‘नोबेल शांतता पुरस्कारा’ची घोषणा आज झाली. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत, डॉ. डेनिस मुकवेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद. लैंगिक अत्याचाराविरोधात उठवलेला आवाज, चालवलेली मोहिम आणि महिला अधिकारासाठी केलेले उत्कृष्ट कार्य यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यांनी युद्धप्रसंगी आणि सशस्त्र संघर्षादरम्यान लैंगिक शोषणाचा हत्यार म्हणून वापर करणे बंद व्हावे यासाठी फार प्रयत्न केला होता.

नादिया या इराकच्या याझदी समुदायातल्या आहेत. आयसीसच्या अतिरेक्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार पीडीत मुलींच्या पुनर्वसनाचे मोठे काम त्यांनी केले आहे. आयसीसने या समुदायातल्या तीन हजार मुलींचे अपहरण करून त्यांचा 'सेक्स स्लेव्ह' म्हणून वापर केला होता. त्यात नादिया मुरादही होत्या. आयसीसच्या ताब्यातून सुटल्यानंतर त्यांनी अशा पीडीत मुलींच्या हक्कासाठी चळवळ उभारली. तर डॉ. डेनिस मुकवेगे  हे काँगो या देशातले सामाजिक कार्यकर्ते आहेत. डॉ. डेनिस यांनी काँगोतल्या यादवीत होरपळलेल्या 85 हजार महिलांवर उपचार केलेत. त्यांनी बुकाव्हू इथे हॉस्पिटल उभारून लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांवर उपचार केले आणि त्यांना आधार दिला.

नोबेल पुरस्कारांमध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार महत्वाचा मानला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी 31 लोकांना नामांकन देण्यात आले होते. या नामांकनामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन आणि पोप फ्रान्सिस यांसारख्यांच्या नावांचा समावेश होता.