Nepal Plane Crash: नेपाळच्या विमान अपघातामध्ये सह-वैमानिक Anju Khatiwada यांचा मृत्यू; 16 वर्षांपूर्वी पायलट पतीनेही प्लेन क्रॅशमध्ये गमावला होता जीव
Anju Khatiwada (संग्रहित संपादित प्रतिमा)

नेपाळमध्ये रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात (Nepal Plane Crash) विमानातील 72 प्रवाशांपैकी 68 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच भारतीयांचाही समावेश आहे. अपघातग्रस्त यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानातील सह-वैमानिक अंजू खतिवडा (Anju Khatiwada) यांनाही या अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. अंजू लवकरच को-पायलटवरून कॅप्टन बनणार होत्या. या विमानाचे पायलट सीनियर कॅप्टन कमल केसी होते, तर अंजू या विमानात सहवैमानिक होत्या.

रिपोर्टनुसार, कॅप्टन कमल केसी यांना विमान उडवण्याचा जवळपास 35 वर्षांचा अनुभव होता. कॅप्टन केसी यांनी यापूर्वी अनेक वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे. या अपघातात कॅप्टन कमल केसी यांचाही मृत्यू झाला आहे.

एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स घेऊन जाणारे यति एअरलाइन्सचे विमान पोखरा विमानतळाजवळ लँडिंगपूर्वी कोसळले. या विमानाच्या सहवैमानिक अंजू खतिवडा यांचे सहवैमानिक म्हणून हे शेवटचे उड्डाण होते. जर त्या विमान उतरवण्यात यशस्वी झाल्या असत्या, तर त्यांना मुख्य पायलटचे प्रमाणपत्र मिळाले असते आणि त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली असती. (हेही वाचा: IndiGo Flight: विमानात रक्तस्त्राव होऊन 60 वर्षीय व्यक्तीचा इमर्जन्सी लँडिंगनंतर मृत्यू)

अंजू यांचे पती दीपक पोखरेल यांचाही सोळा वर्षांपूर्वी याच यती एअरलाइन्सच्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. दीपक हे सहवैमानिक म्हणून तैनात होते. 21 जून 2006 रोजी हा अपघात झाला होता. विमानाने (9N-AEQ) नेपाळगंजहून सुर्खेतला उड्डाण केल्यानंतर हा अपघात झाला. यात चार क्रू मेंबर्स आणि सहा प्रवासी ठार झाले होते. या अपघातानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 2010 मध्ये, अंजू खतिवडा या नेपाळच्या यती एअरलाइन्समध्ये सामील झाल्या होत्या. आता जवजवळ तीन दशकांतील हिमालयातील सर्वात भयानक विमान अपघातात अंजू यांच्यासह किमान 68 लोक ठार झाले आहेत.

अंजू यांनी पतीच्या मृत्यूनंतर विम्यामधून मिळालेल्या पैशातून आपले पायलटचे प्रशिक्षण घेतले होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील 72 लोकांपैकी अद्याप कोणीही जिवंत सापडलेले नाही. नेपाळ सरकारने अपघाताच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. विमानतळ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोखरामध्ये क्रॅश झालेल्या यति एअरलाइन्सच्या विमानाने धावपट्टीपासून 24.5 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर त्याचे लँडिंग पॅड बदलले. जेव्हा विमान पहिल्यांदा संपर्कात आले तेव्हा एटीसीने त्याला रनवे-30 वर उतरण्याची परवानगी दिली, नंतर विमानाने रनवे-12 वर उतरण्याची परवानगी मागितली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लँडिंगपूर्वी वळण घेत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.