द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने (Economist Intelligence Unit) जगातील राहण्यायोग्य शहरांची यादी (World’s Most Livable Cities in 2021) जाहीर केली आहे. यामध्ये न्यूझीलंडमधील (New Zealand) ऑकलंड (Auckland) शहराने जगातील सर्वात राहण्यायोग्य शहराचा मान मिळवला आहे. शहराने मुख्यत्वे कोविड-19 संसर्गाची हाताळणी अतिशय योग्यरीत्या केली. यामुळेच इथे शाळा, थिएटर, रेस्टॉरंट्स आणि इतर सांस्कृतिक आकर्षणे खुली राहू शकली. 22 फेब्रुवारी 2020 ते 21 मार्च 2021 दरम्यान याबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी जगभरात अनेक देश कोरोना विषाणू साथीशी सामना करत होते.
या वर्षाच्या संस्करणात विशेषतः युरोपियन आणि कॅनेडियन देशांनी खराब प्रदर्शन केले. यापूर्वीचे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर, व्हिएन्ना आता 12 व्या स्थानावर घसरले आहे. या वर्षाच्या निर्देशांकात होनोलुलुचा (Honolulu) सर्वाधिक फायदा झाला. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि लसीकरण कार्यक्रमाची जोरदार सुरवात केल्याने, हे शहर 46 व्या स्थानावरून चौदाव्या स्थानावर आहे.
जगातील सर्वात जास्त राहण्यायोग्य शहरांची यादी -
ऑकलंड (न्यूझीलंड)
ओसाका (जपान)
अॅडलेड (ऑस्ट्रेलिया)
वेलिंग्टन (न्यूझीलंड)
टोकियो (जपान)
पर्थ (ऑस्ट्रेलिया)
झ्यूरिच (स्वित्झर्लंड)
जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया)
या यादीनुसार, सिरीयामधील दमास्कस हे जगातील सर्वात कमी राहण्यायोग्य शहर ठरले आहे. अहवालानुसार सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये राहणीमानाची परिस्थिती यावर्षीही बिकट राहिली आहे. (हेही वाचा: El Salvador ठरला Bitcoin ला औपचारिक मान्यता देणारा जगातील पहिला देश; लवकरच चलनात होणार वापर)
जगातील राहण्यासाठी अयोग्य असलेली शहरे-
दमास्कस (सिरिया)
लागोस (नायजेरिया)
पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी)
ढाका (बांगलादेश)
अल्जियर्स (अल्जेरिया)
ट्रिपोली (लिबिया)
कराची (पाकिस्तान)
हरारे (झिम्बाब्वे)
डुआला (कॅमरून)
काराकास (व्हेनेझुएला)
द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या ग्लोबल लिव्हॅबिलिटी हेड उपासना दत्त म्हणाल्या की, कोविड-19 ने जगभरातील लोकांच्या राहणीमानावर परिणाम केला आहे. जगभरातील अनेक शहरे महामारी सुरु होण्यापूर्वीच्या तुलनेत आता कमी राहण्यायोग्य झाली आहेत. यामध्ये युरोप सारख्या प्रदेशानेही वाईट कामगिरी केली आहे.