Lawsuits Against L'Oreal: सौंदर्य प्रसाधन कंपनी लॉरिअल विरुद्ध 57 खटले दाखल; घातक रसायन वापरल्याचा आरोप
Lawsuits Against L'Oreal (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगप्रसिद्ध फ्रेंच कॉस्मेटिक कंपनी लॉरिअल (L'Oreal) विरुद्ध 57 खटले दाखल करण्यात आले आहेत. लॉरिअल आणि इतर कॉस्मेटिक कंपन्या केस सरळ आणि मऊ करण्यासाठी आपल्या उत्प्दानांमध्ये हानिकारक रसायनांचा वापर करतात, असा दावा शिकागो फेडरल कोर्टामध्ये केला आहे. अशा उत्पादनांमुळे कर्करोग आणि इतर आजारांचा धोका असतो.

कॉस्मेटिक कंपन्यांना या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणार्‍या धोकादायक रसायनांच्या हानीबद्दल माहिती होती, परंतु तरीही त्यांनी त्यांची विक्री सुरू ठेवल्याचा दावा आरोपांमध्ये करण्यात आला आहे.

आत्ता कॉस्मेटिक कंपन्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या रसायनांची चौकशी करण्याचे आदेश अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश मेरी रोलँड यांनी दिले आहेत. ज्या कंपन्यांवर आरोप लावण्यात आले आहेत त्यामध्ये  L'Oréal SA ची यूएस उपकंपनी, भारतातील गोदरेज सोन होल्डिंग्स इंक आणि डाबर इंटरनॅशनल या भारतस्थित कंपन्यांच्या उपकंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

परंतु लॉरिअलने आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे सांगत आपला बचाव केला आहे. आमच्या कंपनीच्या उत्पादनात कोणतेही हानिकारक रसायन वापरले जात नाही, असे लॉरिअलने सांगितले आहे. दरम्यान, याआधी जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की केमिकल केस स्ट्रेटनिंग उत्पादनांच्या वापरामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका असतो. (हेही वाचा: Bird Flu Outbreak in Peru: Avian Influenza H5N1 मुळे पेरू मध्ये 585 सी लायन्स, 55 हजार वाईल्ड बर्ड्सचा मृत्यू)

या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या स्त्रिया वर्षातून चार वेळा लोरियल उत्पादने वापरतात त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. दुसरीकडे, ज्या महिलांनी ही लॉरिअल उत्पादने अजिबात वापरली नाहीत, त्यांना कर्करोग होण्याची शक्यता अजिबात दिसली नव्हती.