WHO च्या नकाशामध्ये जम्मू काश्मीर, लडाख दिसले भारतापासून वेगळे; वापरले दोन वेगवेगळे रंग, चहूबाजूंनी कडाडून टीका
Indian map on WHO website (Photo Credits: WHO)

काही दिवसांपूर्वी ट्वीटरने जम्मू काश्मीरचा (Jammu and Kashmir) भाग हा चीनचा असल्याचे दाखवल्याने मोठा गदारोळ मजला होता. आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या एका नकाशात जम्मू-काश्मीरसोबत लडाखला (Ladakh) भारतापेक्षा वेगळा दाखविला आहे. हा कलर कोडेड नकाशा डब्ल्यूएचओच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या नकाशामध्ये संपूर्ण भारताला निळ्या रंगामध्ये दाखवले आहेत तर जम्मू काश्मीर आणि लडाखला राखाडी रंगाने चिन्हांकित केले आहे. जागतिक संस्थेच्या या नकाशाबद्दल ब्रिटनमधील भारतीय प्रवाश्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

नकाशामध्ये देशातील दोन नवीन केंद्रशासित प्रदेश राखाडी रंगात दाखविण्यात आले आहेत, तर संपूर्ण भारत वेगळ्या निळ्या रंगात दिसत आहे. त्याच वेळी, अक्साई चिनचा (Aksai Chin) विवादित भाग राखाडी रंगात दर्शविला गेला आहे ज्यावर निळ्या रंगाचे पट्टे आहेत. डब्ल्यूएचओच्या ‘Covid-19 Scenario Dashboard’ मध्ये हा नकाशा उपलब्ध आहे. हा डॅशबोर्ड, कोणत्या देशात कोरोना विषाणू रुग्णांची किती पुष्टी झाली आहे आणि किती मृत्यू झाले आहेत याची माहिती देतो.

मात्र, हा नकाशा व्हायरल झाल्यांनतर डब्ल्यूएचओवर टीका व्हायला सुरुवात झाली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, ते युनायटेड नेशन्सच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करतात आणि त्यानुसार नकाशे वाचते, समजले आणि पाहिले जातात. लंडनमधील आयटी सल्लागार पंकज यांनी प्रथम हा नकाशा पाहिला. त्यांच्या मते कोणत्यातरी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हा नकाशा शेअर केला गेला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले की, 'जम्मू-काश्मीर आणि लडाखला इतर रंगांत पाहून मला आश्चर्य वाटले. कदाचित चीन याच्या मागे असू शकतो कारण तो डब्ल्यूएचओला मोठा निधी देतो.' (हेही वाचा: भारताने केलेल्या बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये 300 दहशतवादी ठार; पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याचा खुलासा)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी गेल्या वर्षी डब्ल्यूएचओ कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, त्यानंतर डब्ल्यूएचओकडून घडलेली ही गोष्ट संतापजनक असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. दरम्यान, ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाचे ब्रिटनचे अध्यक्ष कुलदीप शेखावत म्हणाले, “मला वाटते डब्ल्यूएचओचा हा गैरकारभार आहे आणि एखादी चूक निदर्शनास आल्यावर त्यांनी ती दुरुस्त करावी. हे भारताचे योग्य चित्रण नाही.’