जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने, 26 फेब्रुवारी रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या बालाकोटमधील (Balakot) जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad) या दहशतवादी संघटनेच्या 'प्रशिक्षण शिबिरां’च्या तळावर 'एयर स्ट्राईक' केला होता. आता या हल्ल्याबाबत एक महत्वाचा खुलाला समोर आला आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली (Agha Hilaly) यांनी एका टीव्ही कार्यक्रमात कबूल केले आहे की, 26 फेब्रुवारी, 2019 रोजी बालाकोटमध्ये भारताकडून झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे 300 दहशतवादी ठार झाले होते.
भारताच्या सर्जिकल स्ट्राईक विषयी इम्रान खानच्या विधानावर वाद घालताना हिलाली यांनी एका वृत्तवाहिनीवर म्हटले की, भारत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून युद्ध अपराध करीत आहे. यात आमचे 300 लोक मरण पावले. भारतीय वायुसेनेने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट येथे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केल्यांनतर पाकिस्तानने त्या ठिकाणी दहशतवाद्यांची कोणतीही उपस्थिती नाकारली होती. तसेच या हल्ल्यात कोणी ठार झाल्याची पुष्टीही त्यांनी केली नव्हती. आता आता याच्या अगदी उलट वक्तव्य हिलाली यांनी केले आहे. बालाकोट हवाई हल्ल्यात 300 दहशतवादी ठार झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
हिलाली बर्याचदा टीव्ही शो डिबेटमध्ये पाकिस्तानी लष्कराची बाजू घेताना दिसून आले आहेत. आता हिलाली म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारताने युद्धासारखे काम केले. त्यात किमान 300 दहशतवादी ठार झाले. आमचे ध्येय त्यांच्यापेक्षा वेगळे होते. आम्ही त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. आम्ही केलेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर होती, कारण ती लष्कराची माणसे होती. आता आम्ही भारताला सांगितले आहे की, ते जे करतील आम्ही त्याला फक्त उत्तर देऊ.’
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या काफिलावर हल्ला झाल्यानंतर भारताकडून हा हवाई हल्ला करण्यात आला. सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सुरक्षा कर्मचारी ठार झाले होते, ज्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या या कृत्याचा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तीव्र निषेध केला होता.