'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूर अझहर याच्या मृत्यूचे वृत्त खोटे; मसूर जिवंत असल्याच्या कुटुंबाचा दावा
JeM chief Masood Azhar | File Image | (Photo Credits: PTI)

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मसूर अझहरच्या (Masood Azhar) मृत्यूचे वृत्त रविवारी (3 मार्च) पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलं होतं. आता मसूदच्या नातेवाईकांनी हे वृत्त फेटाळले असू मसूद जिवंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानी वृत्त वाहिन्या देखील मसूद अजहरच्या मृत्यूचे वृत्त खोटं असल्याचे सांगत आहेत. ('जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहर याचा मृत्यू?; 2 मार्चला पाकिस्तान येथे झाला मृत्यू : सूत्र)

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसैनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर मसूदची प्रकृती खालावली होती. त्याला रावळपिंडीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर मसूदच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरली. मात्र मसूदच्या कुटुंबियांनी मसूद जिवंत असल्याचे सांगितले. मात्र त्याच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती मिळालेली नाही.

तर भारतीय गुप्तचर यंत्रणा देखील मसूदच्या प्रकृतीविषयी माहिती काढत आहे. त्यात मसूदची किडनी निकामी झाले असल्याचे समोर आलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश-ए-मोहम्मदच्या मसूर अझहरला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.  तसंच मसूर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली होती. त्यानंतर मसूद बद्दलच्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं. तर हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर जम्मू-काश्मीर येथील अनेक परिसरात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु होत्या. मात्र पुलवामा हल्ल्याचे तोडीस तोड उत्तर देण्यासाठी 26 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. त्यात 200 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती मिळली होती.