JeM chief Masood Azhar (Photo Credits: PTI)

जम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद विरोधात अनेक राष्ट्रांकडून भारताला पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरला (Masood Azhar) ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तसंच मसूर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.

अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत सांगितले की, "मसूद अझहरवर शस्त्रास्त्र बंदी करण्यात यावी. तसंच त्याची संपत्ती जप्त करुन त्याच्या जागतिक प्रवासावर बंदी घालण्यात यावी." हा प्रस्ताव 'व्हेटो पॉवर’असलेल्या या तीन देशांनी मिळून सादर केला आहे.

"दहशतवादावर मात करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी आम्ही अनेक जागतिक भागीदारांसोबत कार्यरत आहोत," असे भारताचे संयुक्त राष्ट्राचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले.

गेल्या 10 वर्षांत चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र हा प्रस्ताव मंजूर होणार की नाही, हे चीनवर अवलंबून असेल.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं. तर हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर जम्मू-काश्मीर येथील अनेक परिसरात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु होत्या. मात्र पुलवामा हल्ल्याचे तोडीस तोड उत्तर देण्यासाठी 26 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. त्यात 200 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती मिळली आहे. यावर संतापलेल्या पाकिस्तानच्या तीन विमानांनी 27 फेब्रुवारीला सीमा उल्लंघन केले. मात्र भारतीय वायुसेनेची सतर्कता पाहता त्यांनी तेथून ताबडतोब पळ काढला.

महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.