'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहर याचा मृत्यू?; 2 मार्चला पाकिस्तान येथे झाला मृत्यू : सूत्र
JeM chief Masood Azhar (Photo Credits: PTI)

पुलवामा हल्ल्याची जबाबदारी ज्या संघटनेने स्वीकारली होती, त्या ‘जैश-ए-मोहम्मद’चा (Jaish-e-Mohammed) प्रमुख, क्रूर दहशतवादी मसूद अजहर (Masood Azhar) चा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर न्यूज 18 (News18) ने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे 2 मार्च रोजीच मसूदचा मृत्यू झाला आहे. किडनीच्या आजाराने हा मृत्यू झाल्याचे समजते, मात्र अजूनतरी या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. अफगाणिस्तानातून दहशतवादी कारवायांना सुरूवात केलेल्या मसूदने भारतावर अनेक हल्ले केले होते. गेले अनेक दिवस मसून मोस्ट वॉन्टेंड होता.

शनिवारी, भारतीय अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, अजहर मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्रस्त असल्याचा संशय आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील सैनिकी रूग्णालयात त्याच्यावर नियमित डायलिसिस चालू आहे. 2016 मध्ये उरी येथे झालेल्या हल्ल्यात तसेच, 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात आणि 2005 मध्ये अयोध्येत झालेल्या हल्ल्यातही मसूदचा हात होता.

(हेही वाचा: IAF एअर स्ट्राईकसाठी मसूद अजहर हयाचा छोटा भाऊ मौलाना अम्मार याची कबुली, बालकोट येथील हल्ल्याची केली पुष्टी)

1999 च्या कंदहार विमान अपहरणापासून जैशने आपल्या कारवायांना सुरुवात केली. 1994 ला भारत सरकारने अजहर मसूदला अटक केली होती. मात्र त्याला सोडवण्यासाठी भारतीय विमानाचे अपहरण करण्यात आले, ज्यामध्ये 168 प्रवासी होते. शेवटी देशभरातील दबाव वाढल्याने सरकारने भारतातील तुरुंगात असलेल्या मौलाना मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांना सोडले होते.

पुढे 2000 मध्ये त्याने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. जैश-ए-मोहम्मदला भारत, ब्रिटन, अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रसंघानेही दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने 2002 मध्ये त्यांच्यावर बंदी घातली होती. मात्र अजूनही पाकिस्तान त्याला पाठींबा देत असल्याचे बोलले जात आहे.