Israel-Hamas War: गाझामधील पॅलेस्टिनींच्या मृत्यूचा आकडा 20 हजारांवर; मृतांमध्ये 8,000 हून अधिक मुले आणि 6,200 महिलांचा समावेश
Israeli Strikes On Gaza

इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यात नवीन युद्धविरामासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, मात्र याला अजूनतरी यश आलेले नाही. अशात हमास संचालित सरकारी मीडिया कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीमध्ये इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या 20 हजारांवर पोहोचली आहे. मृतांमध्ये 8,000 हून अधिक मुले आणि 6,200 महिलांचा समावेश आहे, तर 52,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि 6,700 इतर बेपत्ता आहेत. सध्या डझनभर इस्रायली ओलिसांना हमासने कैद केले असूनही, इस्रायल अजूनही अंदाधुंद बॉम्बफेक करत आहे.

उत्तर गाझा येथून सुरू झालेला हवाई हल्ला दक्षिण गाझापर्यंत पोहोचला आहे. यासह जमिनीवरील हल्लेही वाढले आहेत. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये युद्धबंदीबाबत महत्त्वाचे मतदान होणार होते, पण अमेरिकेने वारंवार केलेल्या व्हेटोमुळे ते पुढे ढकलावे लागले. आतापर्यंत, युद्धबंदीबाबत बैठक आणि मतदान तीन वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. अमेरिका इस्रायलला सातत्याने शस्त्रे पुरवत आहे. हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 1200 लोकांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता.

ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल आणि हमास यांच्यात सात दिवसांचा युद्धविरामही झाला होता, पण तो 1 डिसेंबरला संपल्यानंतर इस्रायलकडून होणारा बॉम्बहल्ला आणखी वाढला आहे. इस्त्रायली सैन्याने पूर्वी फक्त उत्तर गाझामध्ये रणगाड्यांसह घुसखोरी केली होती, परंतु आता ते दक्षिणेकडेही सरकत आहेत. बॉम्बहल्ल्यांच्या दरम्यान, अमेरिका सतत घातपात कमी करण्याचे आवाहन करत आहे, परंतु इस्त्रायली सैन्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. (हेही वाचा: Indian Student Found Dead In London Lake: बेपत्ता झालेला भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह लंडनच्या तलावात सापडला; UK पोलिसांकडून तपास सुरू)

उत्तर गाझामध्ये बुधवारी बॉम्बस्फोट सुरूच होता, जेथे जबलिया निर्वासित छावणीवर झालेल्या हल्ल्यात 46 लोक ठार आणि डझनभर जखमी झाले. उत्तरेकडून घरे सोडून दक्षिणेत गेलेले पॅलेस्टिनीही सुरक्षित नाहीत. इस्त्रायली सैन्याने रफाह क्रॉसिंगजवळील हॉस्पिटलवर हल्ला केला, ज्यात 10 लोक ठार झाले. दाट लोकवस्ती असलेल्या भागात हवाई हल्लेही केले जात आहेत.

गाझामध्ये मानवतावादी पातळीवरील युद्धविराम सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून सतत प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून लोकांना अन्न आणि पाणी पुरवठा करता येईल. या विषयावर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु अमेरिकेच्या व्हेटोमुळे ते पुढे ढकलण्यात आले. या मुद्द्यावर आज UNSC मध्ये मतदान अपेक्षित आहे आणि अमेरिकेने पुन्हा व्हेटो न दिल्यास गाझामध्ये मानवतावादी युद्धविराम लागू करण्याबाबत आणखी करार केला जाऊ शकतो.