पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर; लोकांना खायला चपातीही उपलब्ध नाही, हजारो रेस्टॉरंट्स बंद
Imran Khan (Photo Credits: Xinhua/PID/IANS)

वाढत्या महागाईपासून पाकिस्तान (Pakistan) मुक्त होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. देशातील टोमॅटोच्या संकटानंतर आता देशावरील पीठाचे संकट (Wheat Flour Crisis) आणखीनच तीव्र झाले आहे. ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ च्या अहवालानुसार लाहोर, कराची तसेच इतर शहरांमध्येही एक किलो पिठाची किंमत 70 रुपयांवर पोहोचली आहे. अहवालात म्हटले आहे की, इम्रान खान यांचे सरकार आल्यापासून पीठाच्या किंमतीत 20 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या सुरू असलेल्या अन्नधान्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने सोमवारी तीन लाख टन गहू आयात करण्यास मान्यता दिली. मात्र देशावर आधीच इतका कर्जाचा बोझा असताना, आता गहू आयात करण्यासाठी पैसे उभा करणे हा सरकारसमोरील मोठा प्रश्न आहे.

पाकिस्तानच्या बर्‍याच राज्यांत लोकांना चपाती मिळणे अवघड झाले आहे. पाकिस्तानमध्ये 20 किलो पीठाची किंमत 1,100 रुपयांवर गेली आहे. पीठाचे दर वाढले आहेत, मात्र सरकार चपातीची किंमत वाढवू देत नाही, त्यामुळे इथले दुकानदार त्रस्त आहेत. घाऊक बाजार व दुकानातून पीठ गायब झाल्याने रोटी, नान आणि पावच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. खैबर पख्तूनख्वाला या संकटाचा सर्वाधिक फटका बसला असून, इथली सुमारे अडीच हजार तंदूर दुकाने पीठाच्या अभावामुळे बंद झाली आहेत. (हेही वाचा: गरीबीच्या उंबरठ्यावर पाकिस्तान; दोन ऐवजी एक चपाती खा- इम्रान खान सरकारचा सल्ला)

इम्रान खान सरकारने देशात सध्या सुरू असलेले चपातीचे संकट रोखण्यासाठी, गहू आयात करण्याचा निर्णय घेण्यास उशीर केला. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक समन्वय समितीने (Economic Coordination Council) मंजूर केलेल्या आयातीअंतर्गत, देशात गव्हाची पहिली मालवाहतूक 15  फेब्रुवारीपर्यंत होईल. दरम्यान, पाकिस्तानने 2018 च्या उत्तरार्धापासून ते जून 2019 दरम्यान 6 लाख मेट्रिक टन गहू निर्यात केला. जुलै 2019 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. परंतु त्यानंतरही ऑक्टोबरपर्यंत 48 हजार मेट्रिक टन गहू परदेशात पाठविला गेला.