सध्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) सामना करण्यासाठी लस (Vaccine) प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच अनेक देशांनी लसीकरण मोहिमेचा जोर वाढवला आहे. लसीकरण हे केवळ गंभीर संसर्गाचा धोकाच कमी करत नाही, तर यामुळे मृत्यूदरही आटोक्यात आणला जातो. अनेक अभ्यासांमध्ये हे उघड झाले आहे. आता अमेरिकन आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने तीन अभ्यासाचे निकाल जाहीर केले आहेत आणि त्यावरून लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचा आग्रह धरला आहे.
या अभ्यासानुसार, ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठी कोरोना संसर्ग अधिक घातक ठरू शकतो. अशा लोकांमध्ये मृत्यूचा धोका 11 पटीने जास्त असू शकतो. तीनही अभ्यास अमेरिकेत केले गेले. या अभ्यासामध्ये, अमेरिकेच्या 13 प्रांतांमध्ये गेल्या एप्रिल ते जुलै दरम्यान कोरोनाची 60 हजारांहून अधिक प्रकरणे पाहिली गेली. ज्यांनी लसीकरण पूर्ण केले नाही त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले गेले. ज्यांनी लसीकरण करून घेतले आहे त्यांच्या तुलनेत ज्यांनी लस घेतली नाही अशांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका साडेचार पट जास्त असल्याचे दिसून आले. (हेही वाचा: Pfizer ची लस ठरली कुचकामी? 6 महिन्यात संपत आहेत शरीरातील Antibodies- US Study मध्ये समोर आली धक्कादायक माहिती)
लस न घेतलेल्या अशा कोरोना पीडितांचा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका दहा पट जास्त असल्याचे दिसून आले. तर मृत्यूचा धोका 11 पट जास्त असल्याचे दिसून आले. कोरोनाचा डेल्टा प्रकार समोर आल्यानंतरही ही लस बरीच प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिल्याने त्यांचा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 80 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. तर 18 ते 64 वयोगटात हा धोका 95 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले.
सीडीसीचे संचालक रोशेल व्हॅलेन्स्की यांनी शुक्रवारी सांगितले, ‘एका अभ्यासाद्वारे आम्ही हे सिद्ध केले आहे की लस खरोखरच काम करते.’