Catastrophic Disasters: 2030 पर्यंत मानवांना दरवर्षी 560 भयंकर आपत्तींचा सामना करावा लागू शकतो; UN च्या अहवालात धक्कादायक खुलासा
Uttarakhand Flood | (Photo Credit: ANI)

हवामान बदल (Climate Change) हे आज संपूर्ण जगासमोर एक गंभीर आव्हान बनले आहे, त्यामुळे केवळ देशांच्या अर्थव्यवस्थेवरच परिणाम होत नाही, तर मानवी जीवनही धोक्यात आले आहे. हवामान बदलाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) एका नव्या अहवालात आणखी चिंताजनक चित्र समोर आले आहे. या अहवालात स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे की, येणारी वर्षे पृथ्वीसाठी अनेक नवीन संकटे घेऊन येऊ शकतात. या अहवालात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर 2030 पर्यंत जग दरवर्षी सुमारे 560 आपत्तींना तोंड देत राहील. 2015 मध्ये अशा आपत्तींची संख्या दरवर्षी 400 च्या आसपास होती.

अहवालात म्हटले आहे की, 1970 ते 2000 पर्यंत, जगात दरवर्षी मध्यम आणि मोठ्या प्रमाणात आपत्तींची संख्या केवळ 90 ते 100 होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी ती वाढत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालात सर्वात चिंतेची बाब सांगितली गेली आहे ती म्हणजे, येत्या काही वर्षांत पृथ्वीवर ज्या आपत्तींमध्ये वाढ होणार आहे, त्यामध्ये जंगलातील आग आणि पूर यांसारख्या नैसर्गिक हवामानाशी संबंधित समस्या तसेच साथीचे रोग आणि रासायनिक दुर्घटना यांचा समावेश आहे. ‘हवामान बदलामुळे हवामानाशी संबंधित धोक्यांची संख्या, वारंवारता, वेळ आणि तीव्रता वाढतच चालली आहे,’ असेही अहवालात म्हटले आहे.

अहवालात आहे की, 2001 च्या तुलनेत 2030 मध्ये उष्णतेच्या तीव्र लाटांची संख्या तीनपट जास्त असू शकते. त्याच वेळी, कोरड्या स्थितीत सुमारे 30 टक्के वाढ दिसून येईल. हवामान बदलामुळे 2030 सालापर्यंत केवळ नैसर्गिक आपत्तींचाच उद्रेक होणार नाही, तर कोरोना विषाणूचा महामारी, आर्थिक मंदी आणि अन्नसंकट यासारख्या मोठ्या समस्यांदेखील उद्भवतील.

संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात म्हटले आहे की, 'हवामान बदलामुळे जगाच्या हवामान चक्रात भयानक बदल झाले आहेत. मानवजातीने घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यातील आपत्तींचा धोका वाढला आहे. ही अशी संकटे आहेत, ज्यासाठी कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही. ज्या देशांमध्ये या नैसर्गिक आपत्तींचा धोका जास्त आहे, त्या देशांत वाढत्या लोकसंख्येमुळे त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणामही गंभीर झाला आहे. (हेही वाचा: शांघाय शहरातील कोरोना नियम कडक, रहिवाशांना आणखी 5 दिवस लॉकडाऊनपासून मिळणार नाही दिलासा)

यूएनच्या आपत्ती जोखीम कमी करण्याच्या विभागाच्या प्रमुख मॅमी मिझोतुरी यांनी या अहवालाविषयी सांगितले की, 'जर आपण हवामान बदलाच्या सद्यस्थितीबाबत कोणतीही मोठी पावले उचलली नाहीत, तर आपण अशा स्थितीपर्यंत पोहोचू जिथे आपत्तीमुळे होणारा विध्वंस हाताळणे खूप कठीण होईल. जग आधीच आपत्तींची मोठी किंमत चुकवत आहे. सध्या नैसर्गिक आपत्तींवरील खर्चापैकी 90 टक्के खर्च आपत्कालीन मदतीसाठी केला जातो. तर पुनर्बांधणीवर केवळ 6 टक्के आणि प्रतिबंधावर केवळ 4 टक्के खर्च होत आहे.’