Guidelines For Quitting Tobacco: धूम्रपान (Smoking) करणे किंवा तंबाखूचे सेवन (Tobacco Consumption) करणे हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हो बाब अनेक आजारांना जन्म देऊ शकते. धुम्रपानामुळे तुमचे आरोग्य आतून पोकळ होते, तसेच यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरातील 1.25 अब्ज तंबाखूचे सेवन करणाऱ्यांपैकी 60 टक्क्यांहून अधिक लोकांना ही सवय सोडायची आहे. आता अशा सर्व लोकांसाठी डब्ल्यूएचओने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
डब्ल्यूएचओ म्हणते की, ही मार्गदर्शक तत्त्वे जगातील सर्व देशांतील लोकांना तंबाखू सोडण्यास आणि तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांचे जागतिक ओझे कमी करण्यासाठी प्रभावीपणे मदत करण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल आहे. काल, 3 जुलै रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदाच अशा प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याचे पालन करून धूम्रपान करणाऱ्यांना त्यांची सवय सोडता येईल.
धूम्रपान सोडण्याबाबत, डब्ल्यूएचओचे महासंचालक म्हणाले की, ही मार्गदर्शक तत्त्वे या धोकादायक उत्पादनांविरुद्धच्या जागतिक लढ्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. हे एक मिशन आहे जे लोकांना तंबाखू सोडण्यास मदत करेल. ते पुढे म्हणाले की, जगात असे बहुतेक देश आहेत जिथे तरुणांमध्ये धूम्रपानाच्या व्यसनाने धोकादायक रूप धारण केले आहे. आमची ही मार्गदर्शक तत्वे या लोकांना तंबाखूचे व्यसन सोडण्यास मदत करतील. (हेही वाचा: Zika Virus Advisory: महाराष्ट्रात झिका व्हायरसची प्रकरणे वाढली; मंत्रालयाने जारी केली अॅडव्हायजरी)
डब्ल्यूएचओने तंबाखू सोडू इच्छिणाऱ्या लोकांसाठी प्रभावी उपचार म्हणून व्हॅरेनिकलाइन, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT), बुप्रोपियन आणि सायटोसिन सुचवले आहेत. यूएस सीडीसीच्या मते, व्हॅरेनिकलाइन ही एक गोळी आहे ज्यामध्ये निकोटीन नसते. यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज आहे. ज्यांनी तंबाखू सोडण्यासाठी इतर औषधे वापरण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ते यशस्वी झाले नाहीत त्यांच्यासाठी हा विशेषतः चांगला पर्याय असू शकतो. बुप्रोपियन हे एफडीए मंजुरी असलेले अँटीडिप्रेसंट औषध आहे, जे आता धूम्रपान बंद करण्यासाठी देखील वापरले जाते.
(टीप- हा लेख फक्त माहितीसाठी आहे. लेटेस्टली मराठी यातील कोणत्याची उपचाराची पुष्टी करत नाही. कोणत्याची उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)