Google (Photo: Shutterstock)

Coronavirus: कोरोनो व्हायरसचा जगभरातील विविध देशांमध्ये प्रादुर्भाव वाढतच आहे. चीनमध्ये या आजाराने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) घोषीत केली आहे. तसेच सर्च इंजिन गुगलनेही (Search Engine Google) आपल्या वाचकांना या आजाराची माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये (Search Engine Result Pages) बदल केले आहेत.

या बदलानुसार, गुगलवर कोणीही 'कोरोना व्हायरस' असे टाईप केल्यास त्याला सर्वात अगोदर या आजारापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी? यासंदर्भात टीप्स तसेच ताजे अपडेट्स आणि इतर अद्ययावत माहिती सर्च रिझल्टमध्ये प्राधान्याने दिसणार आहे. यासाठी गुगलने सर्च इंजिनचे निकाल दाखविणाऱ्या यंत्रणेमध्ये बदल केले आहेत, अशी माहिती गुगलकडून देण्यात आली. (हेही वाचा - Coronavirus: काळजी घ्या! WHO ने घोषित केली जागतिक आरोग्य आणीबाणी)

गुगलने कोरोनो व्हायरसपासून वाचण्यासाठी केवळ सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये बदल केलेला नसून या आजाराशी लढण्यासाठी आर्थिक मदतही केली आहे. गुगल डॉट ऑर्गकडून चीनमधील रेड क्रॉस सोसायटीला 250000 डॉलरची मदत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुगलने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी चीनमधील आपली सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त गुगलने हाँगकाँग आणि तैवानमधील आपली कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद केली आहेत.