प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीनच्या वूहान शहरातून कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रादुर्भावाला सुरुवात झाली आणि बघता बघता संपूर्ण जग या विषाणूने गिळंकृत करायला सुरुवात केली. याच्या वाढत्या प्रभावामुळे उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले. उत्पादन, गोष्टींच्या निर्मितीवर गदा आली. याचा परिणाम म्हणून आता जगात बेरोजगारी (Unemployment) इतकी वाढत आहे की सध्या आर्थिक मंदीची चिंता भेडसावू लागली आहे. अशात अमेरिकेतील (US) 3.3 दशलक्ष लोकांनी स्वत: ला बेरोजगार म्हणून घोषित केले आहे. या लोकांनी अमेरिकेत बेरोजगारी भत्त्यासाठी (Unemployment Benefits) अर्ज केला आहे. अमेरिकन माध्यमांच्या म्हणण्यानुसार हा आकडा धक्कादायक आहे.

सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणांमध्ये 85,600 पेक्षा अधिक केसेससह अमेरिका जगात अव्वल आहे. या बाबतीत अमेरिकेने चीन आणि इटलीलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत या प्राणघातक कोरोना विषाणूमुळे लॉकडाउनशिवाय कोणताच पर्याय उरला नाही. लोकांच्या रोजगार जाण्याचे हे महत्वाचे कारण आहे. आता हवालदिल झालेल्या 33 लाख लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज दाखल केला आहे. अमेरिकेतील कामगार विभागाकडून दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या बेरोजगारीच्या अहवालामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या या अहवालात, कोरोनो विषाणूचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विनाशकारी परिणामाचे स्पष्ट पुरावे देण्यात आले आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे अमेरिकन कॉंग्रेसने दोन ट्रिलियन डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे. याबाबत अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की, कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्था एका वाईट टप्प्यातून जात आहे. मंदीची चिन्हे दिसत असताना समोर आलेल्या या अहवालातील आकडेवारी धक्कादायक आहे. (हेही वाचा: इतर देश कोरोना विषाणूचा सामना करत असताना, चीनमध्ये सुरु झाले कारखाने व उत्पादन; वूहानमधून हटवले निर्बंध)

कामगार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 1982 मध्ये 6 लाख 95 हजार लोक बेरोजगार झाले होते. मात्र सध्या समोर आलेला 3.3 दशलक्ष हा आकडा पुढील काळात वाढण्याचीही शक्यता आहे. कोरोना संकटामुळे अमेरिकेत रेस्टॉरंट्स, बार, सिनेमा, हॉटेल आणि जिम वगैरे बंद आहेत. कार आणि टेक कंपन्यांनी उत्पादन थांबविले आहे, हवाई सेवा मर्यादित आहेत. न्यूयॉर्कमध्ये जगभरातील कोरोना विषाणूच्या 5 टक्के संक्रमण झाले आहे. परंतु बेरोजगारी भत्त्याच्या दाव्यांमध्ये 1 हजार टक्के वाढ झाली आहे.