Coronavirus: इतर देश कोरोना विषाणूचा सामना करत असताना, चीनमध्ये सुरु झाले कारखाने व उत्पादन; वूहानमधून हटवले निर्बंध
File image of Chinese President Xi Jinping | (Photo Credits: PTI)

सध्या जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) आपली दहशत माजवली आहे. भारत, अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी तसेच जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू मुळे लॉकडाऊन आहे. तर दुसरीकडे या विषाणूचे केंद्रस्थान असलेला चीन (China) आता रुळावर येत आहे. चीनमधील कंपन्या पुन्हा एकदा आपल्या निर्मितीचे कुलूप उघडत आहेत व उत्पादन सुरु केले जात आहे. चीनमध्ये होंडा, निसान, टोयोटा आणि फोक्सवॅगन सारख्या कार कंपन्यांनी पुन्हा एकदा कार निर्मिती सुरू केली आहे. इतकेच नाही तर, चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान जे कोरोना विषाणूचे उगमस्थान ओळखले जाते, त्या शहरातही लोक आता आपल्या कामावर परतत आहेत.

गेल्या महिन्यात चीनमधील कारच्या विक्रीची पातळी ऐतिहासिकरित्या वर गेली. याचाच अर्थ आता चीनमध्ये कोरोनाचा परिणाम संपुष्टात येत आहेत, गोष्टी हळू हळू सुधारत आहेत. चीनमधील वाहन उद्योग समुहाने सांगितले की, आता लोक हळूहळू खरेदीकडे परतत आहेत. एवढेच नव्हे तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशाच्या हवाई क्षेत्रातही सतत सुधारणा होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विमान क्षेत्रात 2.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या व्यतिरिक्त, चीनमधील लोकांचे दैनंदिन जीवनदेखील सुरळीत सुरु झाले आहे. मागील आठवड्यात मेट्रो वाहतुकीत 21% वाढ झाली आहे. वूहानमध्ये नऊ आठवड्यांच्या लॉकडाउननंतर प्रथमच शहरातील बससेवा बुधवारी सुरू करण्यात आली. चीनने मंगळवारी मध्य हुबेई प्रांतातील 506 दशलक्षाहून अधिक लोकांवर लादलेली बंदी तीन महिन्यांनंतर उठविण्याचा निर्णय घेतला. तसेच फ्रिज, वॉशिंग मशिन यासारख्या मोठ्या उपकरणांची खरेदीही वाढली आहे.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बहुतेक चीनमध्ये लॉकडाऊन होता. विशेषत: हुबेई प्रांतात कर्फ्यूची परिस्थिती होती, जिथे वुहान शहरातून कोरोना विषाणूचा आजार पसरला होता. सॅनफोर्ड येथील विश्लेषक सी. बर्नस्टेन यांनी सांगितले की, सध्याचा रिअल-टाइम इंडिकेटर सूचित करत आहे की, चीनने पुन्हा आपले औद्योगिक कॉम्प्लेक्स सुरू केले आहेत. अर्थात ते अद्याप प्राथमिक टप्प्यात आहेत परंतु लवकरच त्यात वाढ दिसून येईल. वूहान प्रांतात दोन मोठे कार निर्मितीचे कारखानेही सुरु झाले आहेत. (हेही वाचा: चीन वेडा बनून खातयं पेढा? जग देतंय कोरोना व्हायरस विरोधात लढा; हिंद महासागरात तैनात चायनीज अंडरवॉटर ड्रोन)

बुधवारी चीनच्या हुबेई प्रांतातून प्रवासाचे निर्बंध हटविण्यात आले, मंगळवारी याची घोषणा करण्यात आली. हुबेईची लोकसंख्या सुमारे 60 दशलक्ष आहे. सध्या इतकी लोकसंख्या असलेला इटली अद्याप कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करत आहेत. चिनी प्रशासनाने म्हटले आहे की, त्यांनी या क्षणी या संक्रमणावर नियंत्रण ठेवले आहे परंतु ते पुन्हा परत येण्याची शक्यता आहे.  तर अशाप्रकारे इतर देश कोरोना विषाणूचा सामना करत असताना, चीनमध्ये कारखाने व उत्पादन सुरु झाले आहे.