अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (22 एप्रिल) दिवशी अमेरिकेमध्ये परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या आध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. दिवसागणिक अमेरिकेत वाढणार्या कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉनल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय पुढील 60 दिवसांसाठी लागू असेल. यामध्ये अमेरिकेत असणार्या ग्रीन कार्ड होल्डर्ससाठीदेखील काही बंधनं घालण्यात आली आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या निर्णयावरून स्थानिक तज्ञ वकिल आणि कायदेपंडितांकडून टीका देखील करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाचा फटका अमेरिकेतील नोकर्यांवरही झाला आहे. त्यामुळे स्थानिक अमेरिकन नागरिकांच्या नोकर्या वाचवण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटानंतर जेव्हा पुन्हा अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील तेव्हा पहिलं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना मिळावं यासाठी हा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले.
डॉनल्ड ट्रम्प यांचा Immigration Ban कुणासाठी लागू आहे?
23 एप्रिलच्या रात्री 12 वाजल्यापासून अमेरिकेत परदेशी व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही.
ज्या व्यक्तीकडे अमेरिकेने आखून दिलेल्या कालमर्यादेमधील Immigrant Visa नाही त्याला प्रवेश नाही.
व्हिसा व्यतिरिक्त ज्यांच्याकडे अधिकृत ट्रॅव्हल डॉक्युमेंट नाही जसे की advance parole document त्यांना अमेरिकेत प्रवेश नाही.
अमेरिकेत राहणार्या पददेशी नागरिकांच्या ग्रीन कार्डवर कुटुंबातील व्यक्तींना मिळणारी सवलत थांबवण्यात आली आहे.
अमेरिकेत राहणार्या परदेशी नागरिकांच्या ग्रीन कार्डवर पालक किंवा भांवडांना मिळणारी सवलतही थांबवण्यात आली आहे.
Immigration Ban मधून सवलत कशाबाबत मिळू शकते?
अमेरिकेत काम करणार्या H1B कामगारांना सूट मिळाली आहे. H1B अंतर्गत अमेरिकन कंपनीमध्ये परदेशी नागरिकांना काम करता येते. या व्हिसामुळे अनेक भारतीय तंत्रज्ञ मंडळी काम करत आहेत.
अमेरिकन नागरिकांच्या साथीदारांना आणि मुलांना सवलत आहे.
COVID-19 च्या पार्श्वभूमीवर Immigrant Visa वर अमेरिकेत वैद्यकीय सेवा देण्यासाठी येणार्या डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य यंत्रणेशी निगडीत कर्मचार्यांना सवलत आहे.
EB5 immigrant investor यांना देखील वगळण्यात आलं आहे. यांच्या द्वारा अमेरिकेत मोठी आर्थिक गुंतवणूक केली जाते.
अमेरिकेतील या बॅनमध्ये विद्यार्थ्यांच्या student visas चा समावेश नाही.
2016 पासून अमेरिकेमध्ये डॉनल्ड ट्रम्प हे परदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील स्थलांतरावरून आग्रही आहेत. त्यांच्यामध्ये अशाप्रकारच्या स्थलांतरामुळे अमेरिकन नागरिकांना त्यांच्याच देशात बेरोजगारीला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान या कोरोना व्हायरस संकटामध्ये 20 मिलियन अमेरिकन नागरिकांच्या कामधंद्यावर गदा आली आहे.