Donald Trump | (Photo Credits: Facebook)

6 जानेवारी रोजी कॅपिटल इमारतीवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साइट्सने निलंबित केले होते. पण आता ट्रम्प स्वत: चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) सुरू करण्याची योजना आखत आहेत. अशी बातमी आहे की, ट्रम्प येत्या तीन महिन्यांत सोशल मीडियावर दिसू लागतील. ट्रम्पचे वरिष्ठ सल्लागार जेसन मिलरने ही माहिती दिली आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांच्यावर सर्व सोशल मीडिया कंपन्यांनी बंदी घातली होती.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मिलर म्हणाले की, मला असे वाटते की आम्ही आगामी 2 ते 3 महिन्यांत माजी अध्यक्ष ट्रम्प यांना पुन्हा सोशल मीडियावर पाहू शकू. ही गोष्ट त्यांच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरून होणार आहे. नवीन प्लॅटफॉर्म 'सोशल मीडियाचा गेम' पूर्णपणे बदलून टाकेल असा दावा त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांच्यावर 6 जानेवारी अमेरिकेच्या कॅपिटलवर रोजी हिंसा भडकवण्याचा आरोप होता. या घटनेत एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच जण ठार झाले होते. यानंतर ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमचे निलंबित केले. याशिवाय फेसबुकनेही त्यांचे अकाउंट काढून टाकले. जानेवारीमध्ये ट्विटरने ट्रम्प यांचे खाते 12 तास ब्लॉक केले होते आणि व्हिडिओसह त्यांचे तीन ट्विट हटवले होते.

आता मिलर यांनी ट्रम्प यांच्या नव्या योजनेविषयी माहिती देताना म्हणाले की, या प्रक्रियेस बराच वेळ लागला आहे आणि यामुळे खूप मोठे काहीतरी घडणार आहे. मिलर म्हणाले की, ट्रम्प यांच्या डिजिटल उपस्थितीमुळे करोडो लोक त्यांच्यासोबत जोडले जाऊ शकतात. याद्वारे ते बर्‍याच लोकांना आकर्षित करू शकतात. (हेही वाचा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden विमानात चढताना घसरले (Watch Video))

दरम्यान, ट्रंप यांना सोशल मिडियावरून निलंबित केल्यांनतर, समर्थकांचे म्हणणे होते की ट्रम्प यांचे खाते कायमचे निलंबित करणे ही अमेरिकेच्या राज्यघटनेतील पहिल्या दुरुस्तीवरील म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हिंसा होय. मात्र, त्यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, हा नियम घटनेत आहे आणि तो सरकारी संस्थांना लागू आहे. ट्विटर ही खासगी कंपनी आहे त्यामुळे असा निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत.