US President Donald Trump (Photo Credits: Getty Images)

अमेरिकेमध्ये (US) 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (Presidential Election 2020) होणार आहेत. या निवडणुका देशातील सर्वात मोठ्या निवडणुका असल्याने जोरदार याचा प्रचार सुरु आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या दरम्यानही प्रचार व प्रचार सभांना वेग आला आहे. मात्र, एका अभ्यासानुसार, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या 18 रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या सुमारे 30,000 लोकांना कोरोना संसर्गाची पुष्टी झाली असल्याचा अंदाज आहे. याशिवाय या सभांमध्ये सामील झाल्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही 700 ने वाढली आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी (Stanford University Researchers) डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभांचा तपशीलवार अभ्यास केला. ज्यामध्ये हा मुद्दा समोर आला.

अशाप्रकारे जनतेला या सभांची किंमत एकतर आजारी पडून किंवा आपला जीव गमावून द्यावी लागली. हे संशोधन,  'The Effects of Large Group Meetings on the Spread of COVID-19: The Case of Trump Rallies', या नावाने प्रकाशित केले गेले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या या अभ्यासासाठी संशोधकांनी 20 जून ते 22 सप्टेंबर या कालावधीत अध्यक्ष ट्रम्प यांच्या 18 सभांचे विश्लेषण केले. त्यानंतर संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, या मोर्चांमुळे संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्या 30,000 आणि मृतांची संख्या 700 पर्यंत वाढली आहे. जर या सभा नसत्या तर हे लोक कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचू शकले असते आणि मृत्यूची संख्याही टाळता आली असती. (हेही वाचा: अमेरिकेची यंदाची राष्ट्रपती निवडणूक असेल देशातील सर्वात महागडी निवडणूक; जाणून घ्या होणारा खर्च)

संशोधकांचे म्हणणे आहे की, हा अभ्यास कोरोना व्हायरसबाबतचे असे इशारे बरोबर असल्याचे सांगतो ज्यामध्ये म्हटले आहे की, मोठ्या संख्येने मोर्चात लोक मास्क घालत नाहीत आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत नाहीत. हा अभ्यास प्रकाशित झाल्यानंतर राष्ट्रपतीपदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले. बिडेन यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘अध्यक्ष ट्रम्प आपली काळजी घेत नाहीत आणि त्यांना आपल्या समर्थकांचीही काळजी नाही.’

दरम्यान, या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की रोग निवारण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) आधीपासूनच चेतावणी दिली होती की, गर्दी असलेल्या, जिथे लोक मास्क घालत नाहीत आणि सामाजिक अंतर पाळत नाहीत, ठिकाणी संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. याबाबत घाबराण्याचे एक कारण म्हणजे अशा सभा 'सुपर स्प्रेडर इव्हेंट्स' होऊ शकतात व  त्यानंतर साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे फार कठीण होऊ शकेल.