Joseph Metheny (संग्रहित संपादित प्रतिमा)

याआधी आपण अनेक सिरीयल किलरबद्दल (Serial Killer) ऐकले असेल, वाचले असेल, परंतु आज आम्ही ज्या सिरीयल किलरबाबत सांगणार आहोत त्याची कहाणी ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल. तर अमेरिकेमध्ये एका भयानक सिरीयल किलरबाबत खुलासा झाला होता. या सीरियल किलरने एकामागून एक तब्बल 13 जणांचा बळी घेतल्याचे सांगितले गेले होते. मात्र हा आकडा 30 च्या आसपास असल्याची शक्यता वर्तवली गेली होती.

महत्वाचे म्हणजे त्याने हत्या केलेल्या लोकांना एका मोठ्या फ्रीजरमध्ये साठवले आणि नंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते शिजवले. त्यानंतर त्याच्यापासून बर्गर पॅटीज बनवल्या. इतकेच नाही तर या सिरीयल किलरने मानवी मांसापासून बनवलेल्या बर्गर पॅटीजचा स्टॉल लावला आणि त्या बर्गर पॅटीज विकल्या देखील. सीरियल किलरने हे काम इतक्या हुशारीने आणि चलाखीने केले की त्याच्यावर कुणालाही संशय आला नाही.

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जोसेफ मेथेनी (Joseph Metheny) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने बहुतेक महिलांना आपला बळी बनवले. तो अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात राहत होता. पोलिसांनी सिरियल किलर जोसेफ मेथेनी याला डिसेंबर 1996 मध्ये पकडले, जेव्हा तो मानवांची हत्या केल्यानंतर त्यापासून केलेल्या बर्गर पॅटीज विकत होता. त्याच्या स्टॉलवर बर्गर खाणाऱ्यांना हे माहित नव्हते की मेथेनीने त्यांना नरभक्षक पॅटीज दिल्या आहेत.

पोलिसांना त्याने सांगितले की, तो हत्येनंतर मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवत असे. त्यानंतर तो शवाचे तुकडे करून ते इतर प्राण्यांच्या मांसात मिसळून शिजवत असे. त्याच्याविरुद्धच्या खटल्यादरम्यान सीरियल किलरनेही हे सत्य मान्य केले होते. खटल्यादरम्यान, सीरियल किलरने न्यायालयात सांगितले की, त्याला लोकांच्या हत्येचा कोणताही पश्चाताप नाही. उलट खुनाच्या गुन्ह्यात त्याला आनंद मिळत असे त्याने सांगितले. त्याने आपण मारलेल्या लोकांपैकी कोणाशीही आपले वैर नसल्याचेही तो म्हणाला. जेव्हापासून त्याची पत्नी त्याच्या 6 वर्षाच्या मुलासह घर सोडून गेली तेव्हापासून त्याने आपला त्रास कमी करण्यासाठी लोकांना मारण्याचा मार्ग स्वीकारला. (हेही वाचा: विकृत: महिलांची हत्या करून प्रेतासोबत सेक्स; सीरियल किलर जेरबंद, 12 हल्ल्यात 5 जणींचा बळी)

जोसेफ मेथेनी दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 50 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. परंतु तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. 5 ऑगस्ट 2017 रोजी तो कारागृहात मृतावस्थेत आढळला. या धोकादायक सिरीयल किलरचा मृत्यू नैसर्गिक होता की तुरुंगात कोणीतरी त्याची हत्या केली हे स्पष्ट झाले नाही. परंतु या सिरीयल किलरने 1990 च्या दशकात बाल्टिमोर शहरात दहशत माजवली होती हे नक्की.