
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूशी (Coronavirus) संपूर्ण जग गेल्या वर्षभरापासून लढा देत आहे. दरम्यान, अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. परंतु, अजूनही काही देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असून अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मात्र वेगळाच इशारा दिला आहे. कोरोना महामारीचे दुसरे वर्ष पहिल्या वर्षाच्या तुलनेत अधिक भयंकर आहे, असे जागतिक आरोग्य संघटने अध्यक्ष डॉ. टेड्रॉस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
कोरोना महामारीच्या काळामध्ये लसीचा पुरवठा हे एक सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे. मात्र, जगातील काही प्रमुख लस उत्पादक देश यासंदर्भात इतर देशांना मदतीचे धोरण अंगीकारत आहे. याचा मला आनंद होत आहे. काही देशांनी लसींचा साठा इतर देशांना पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच काही लस उत्पादक कंपन्यांनी लसीचा फॉर्म्युला देण्याचीही तयारी दर्शवली आहे, असे टेड्रॉस म्हणाले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत 33 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आपण कोरोनाच्या दुसऱ्या वर्षात आहेत. कोरोनाचे दुसरे वर्ष पहिल्या वर्षापेक्षा घातक असेल. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू, असेही टेड्रॉस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- USA मध्ये लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी मास्क लावण्याचे निर्बंध हटवले
भारतासह अनेक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. या यादीत नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड आणि इजिप्तमध्ये यांसारख्या देशांचा समावेश आहे. भारतासह या सर्व देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या सर्व देशांना शक्य ती मदत देण्याचे अश्वासन दिले आहे.