जगातील इतर देशांप्रमाणेच नेपाळ (Nepal) मध्येही कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या आजाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेता येथेही सरकारने मार्चपासून लॉक डाऊन (Lockdown) लागू केले होते. साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. पण या सर्वांच्या दरम्यान आता नेपाळमध्ये सरकारसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील धार्मिक नेते आणि पुरोहित यांनी सरकारला इशारा दिला आहे. मच्छिंद्रनाथ यात्रेचे नेतृत्व करणारे मुख्य पुजारी कपिल बज्राचार्य म्हणतात की, कोरोना मुळे लादलेल्या निर्बंधामुळे जर देव रागावला तर आपण कोरोना विषाणूपेक्षा कितीतरी मोठ्या अडचणीत सापडू शकतो.
बीबीसीने याबाबत विस्तृत वृत्त दिले आहे. निर्बंधाअंतर्गत नेपाळमधील सर्व मंदिरे सध्या बंद आहेत, मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र येण्यासही बंदी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजेच दसरा आणि दिवाळीपर्यंत हे निर्बंध हटवण्याची फारशी शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हिंदू आणि बौद्ध संस्कृती असलेल्या नेपाळमध्ये कोरोना साथीच्या दरम्यान कोणताही मोठा उत्सव साजरा झाला नाही. राजधानी काठमांडूमध्ये देवतांच्या सन्मानार्थ रथयात्रा करण्यासारखे विधी रद्द करण्यात आले आहेत. यावर सरकार ज्या प्रकारे धार्मिक सणांना मनाई करीत आहे, ते अत्यंत बेजबाबदार आहे असे कपिल बज्राचार्य म्हणतात.
ते म्हणाले, ‘माझे कुटुंबीय शतकानुशतके मच्छिंद्रनाथ यात्रा करत आहेत. मला खूप वाईट वाटते की, माझ्या कार्यकाळात मला यात्रा घेण्याची परवानगी नाही. यापूर्वी ही यात्रा कधीही रद्द केलेली नाही. नेपाळ सरकार ज्या प्रकारे धार्मिक कार्यांवर अंकुश ठेवत आहे त्यावर माझा तीव्र आक्षेप आहे. मला वाटते की हे पाप आहे.’ पाटण येथे राहणारे 38 वर्षांचे व्यावसायिक बाबूजा ज्ञापा यांनीही नेपाळ सरकारच्या निर्णयामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत असे म्हटले आहे. ते म्हणतात, ‘माझा धर्मावर खूप जास्त विश्वास आहे आणि मला वाटते की धार्मिक कार्यात सामील न होऊ दिल्यामुळे अपशकून होऊ शकतो.’ (हेही वाचा: ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये कोरोना विषाणूचा हाहाकार; तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना COVID-19 चा संसर्ग)
मात्र काही समुदाय आणि धार्मिक नेते म्हणतात की, हे वर्ष सर्व धार्मिक बाबींसाठी अपवाद मानले जाऊ शकते आणि सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर सर्व सण साजरे केले जाऊ शकतात.
दरम्यान, आतापर्यंत नेपाळमध्ये कोरोना संसर्गाची 78 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 500 लोक मरण पावले आहेत. काठमांडूमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे आणि आता लोक सणा-सुदीच्या काळात घरी परतल्यामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे.