सौदी राजघराण्यातील सदस्य (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीनच्या (China) वूहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) जवळजवळ संपूर्ण जगावर कब्जा केला आहे. जगातील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अनेक ठिकाणी आता कोरोना विषाणूने शिरकाव केल्याचे दिसत आहे. सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) राजघराण्यापर्यंत हा विषाणू पोहोचला आहे. रियाधचे राज्यपाल असलेले सौदीचे ज्येष्ठ राजकुमार, यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. तसेच राजघराण्यातील अजूनही बरेच सदस्य आजारी पडले आहेत. यामुळे राजघराण्यातील अनेक सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. द न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

अल-सौद घराण्यातील सदस्यांवर उपचार चालू असलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी 500 बेड्सची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. हॉस्पिटल अधिकाऱ्यांनी याबाबत हाय अलर्ट दिला होता. किंग फैसल स्पेशलिस्ट हॉस्पिटल इथे या सदस्यांवर उपचार चालू आहेत. राजघराण्यातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार शाही परिवारातील जवळजवळ 150 सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता आहे. डॉक्टर आणि कुटुंबातील जवळच्या लोकांच्या मते, राजघराण्यात अनेक राजकुमारांचा समावेश असून, त्यांच्यातील बरेचजण नियमितपणे युरोपचा प्रवास करतात. तिथूनच हा विषाणू राजघराण्यात आल्याचे मानले जात आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीने 84 वर्षीय राजा सलमानने स्वतःचे राहण्याचे ठिकाण बदलले आहे. आता सुरक्षेसाठी लाल समुद्रावरील जेद्दह शहराजवळील बेटांच्या राजवाड्यात राजाचे वास्तव्य आहे. तर त्याचा मुलगा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, त्याचा मुलगा आणि 34 वर्षीय डी फॅक्टो शासक, याने आपल्या मंत्रायंसह किनाऱ्यावरील दुर्गम भागात आसरा घेतला आहे. याच ठिकाणी त्याने निओम म्हणून ओळखले जाणारे एक भविष्यकालीन शहर बांधण्याचे आश्वासन दिले आहे. (हेही वाचा: Coronavirus वरील उपचारासाठी ब्राझीलच्या राष्ट्रपतींची रामायणातील 'या' प्रसंगाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधाची मागणी)

दरम्यान, जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार असणाऱ्या सौदी अरेबियामध्ये, आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 41 मृत्यूची नोंद झाली आहे आणि 2,795 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या संक्रमांच्या भीतीने राज्यकर्त्यांनी सौदी अरेबियाच्या प्रवासावर निर्बंध घालण्यास सुरवात केली. 2 मार्च रोजी कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण नोंदवण्यापूर्वीच मक्का आणि मदीना या मुस्लिम पवित्र स्थळांची तीर्थयात्र बंद केली गेली.