कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्या लाटेमुळे संपूर्ण जगात पुन्हा एकदा हा संसर्ग पसरू लागला आहे. काही देशांमध्ये तर अतिशय वाईट परिस्थिती आहे व त्यापैकी भारतदेखील एक आहे. देशात गेल्या 24 तासांत 1.85 लाख नवीन कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. दुसरीकडे, नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की कोविड-19 चे आधी व्यायाम करत नसलेले रुग्ण गंभीररित्या आजारी होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच, अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका देखील वाढतो. व्यायामाचा अभाव याशिवाय वाढते वय आणि अवयव प्रत्यारोपण यामुळेही कोरोनाचा धोका वाढतो. म्हणजेच, आळशी लोकांवर कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम होतो.
मंगळवारी ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये (British Journal of Sports Medicine) प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळले की, जे लोक महामारी येण्यापूर्वी कमीतकमी 2 वर्षे निष्क्रिय होते, ज्यांची शारीरिक हालचाल जास्त नव्हती अशा लोकांमध्ये रुग्णालयात दाखल करणे, आयसीयूमध्ये उपचार घेणे आणि मृत्यूची शक्यता जास्त होती. तज्ञांनी सांगितले की, धूम्रपान, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब या तुलनेत ‘शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय राहणे’ हा सर्वात मोठा धोका आहे.
ज्यांची जीवशैली Sedantary आहे म्हणजेच, जे लोक दिवसभर एकाच ठिकाणी बसतात किंवा जास्त शारीरिक हालचाल करीत नाहीत त्यांच्यावर कोरोना जास्त प्रमाणात हल्ला करतो. म्हणूनच, या कठीण काळात नियमित व्यायाम करणे आणि स्वत: ला तंदुरुस्त ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे योग, व्यायाम, दोरी उड्या, पोहणे, सायकलिंग, चालणे अशा, ज्या तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील त्या शारीरिक क्रिया करत चला.
संशोधकांनी जानेवारी ते ऑक्टोबर 2020 दरम्यान अमेरिकेतील 48,440 कोरोना रूग्णांचा या रिसर्चमध्ये समावेश केला होता. रुग्णांचे सरासरी वय सुमारे 47 वर्षे होते आणि पाचपैकी तीन महिला होत्या. यातील सुमारे अर्ध्या रूग्णांना कोणताही आजार नव्हता. सुमारे 20 टक्के रुग्णांना मधुमेह, फुफ्फुसाचा आजार, हृदयरोग किंवा मूत्रपिंडाचा आजार किंवा कर्करोग यांसारखा एक आजार होता. 30 टक्के पेक्षा जास्त लोक दोन आजारांनी ग्रस्त होते. (हेही वाचा: Coronavirus: कोरोना विषाणू महामारीचा अंत अद्याप दूर आहे, लस हे एकमेव शस्त्र नाही - WHO)
संशोधनातून असा निष्कर्ष काढला गेला की, कोरोना केवळ धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरच परिणाम करीत नाही, तर प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आळशी व्यक्तींच्यावरही त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.