चीन आकाशात सोडणार कृत्रिम चंद्र ; नैसर्गिक चंद्राच्या आठपट अधिक असेल प्रकाश
चंद्र (Photo Credit: PTI)

भारताच्या शेजारील देश चीन नवा इतिहास रचणार आहे. चीनच्या हटके शोधांमध्ये आता अजून एका शोधाची भर पडणार आहे. चीन आकाशात तीन मानवनिर्मित चंद्र सोडणार असून त्याची तयारीही चीनने सुरु केली आहे.

‘चेंगडू एरोस्पेस सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सिस्टम रिसर्च इंस्टिट्यूट कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष वू चुनफेंग यांनी ही माहिती दिली आहे. ही संस्था आकाश संशोधन क्षेत्रात काम करते. या योजनेअंतर्गत चीन अंतराळात तीन कृत्रिम चंद्र सोडणार आहे. या कृत्रिम चंद्रांचा प्रकाश हा नैसर्गिक चंद्राच्या आठपट अधिक असेल. सध्या यासंदर्भात काम सुरु असून ही योजना 2020 पर्यंत प्रत्यक्षात अवतरेल. यासाठी चीनमधील चेंगदू भागाची निवड करण्यात आली आहे. यी योजना प्रत्यक्षात उतरल्यास चेंगदू शहरात स्ट्रीट लाईटची आवश्यकता भासणार नाही.

माहितीनुसार, चीन 2020 मध्ये अंतराळात पाठवणारा कृत्रिम चंद्र म्हणजे एक उपग्रह असेल. तो उपग्रह दिवसभर सूर्याच्या किरणं प्रतिबिंबित करुन रात्री शहरामधील 10 ते 80 किलोमीटरचा परिसराला प्रकाश देईल. उपग्रहांवर आरश्यासारख्या परावर्तित करणाऱ्या वस्तूपासून बनवलेले आवरण लावलेले असेल. हा कृत्रिम चंद्र जमिनीपासून अवघ्या 500 किलोमीटरवरच्या अंतरावर असेल.

मात्र चीनच्या या मोहिमेला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. कृत्रिम चंद्राचे अनेक दुष्परिणाम आहेत. या कृत्रिम चंद्राच्या प्रकाशाने माणसं आणि प्राण्यांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

चीनची ही मोहीम 1999 मधील रशियातील एका संशोधकाच्या योजनेवर बेतलेली आहे. यापूर्वी रशियाने कृत्रिम चंद्र अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो फसला होता. चीनचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास आकाश संशोधन क्षेत्रातील ही क्रांती ठरेल.