Amoeba | Image used for representational purpose (Photo Credits: Wikipedia)

Brain Eating Amoeba: अमेरिकेतील (America) फ्लोरिडा (Florida) मध्ये मानवी मेंदूचा नाश करणाऱ्या अमीबाचे (Amoeba) एक नवीन प्रकरण समोर आले आहे. फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने ‘नेगलेरिया फोवलेरी’ (Naegleria Fowleri) नावाच्या अमिबाच्या संसर्गाची पुष्टी केली आहे. हा अमिबा मानवी मेंदूला अक्षम बनवण्याचं काम करतो. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा एक पेशी असणारा अमीबा एखाद्या व्यक्तीचा मेंदू नष्ट करू शकतो.

या अमीबामुळे मेंदूमध्ये ‘प्राइमरी एम्बरिक मेनिंगोएन्सेफॅलायटीस’ (पीएएम) नावाचा संसर्ग होतो. त्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1962 मध्ये अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे या आजाराने ग्रासलेले 37 रुग्ण आढळले होते. डॉक्टरांनी या संदर्भात फारशी माहिती दिली नाही. मात्र, डॉक्टरांनी या प्राणघातक अमीबाबद्दल सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. हा अमीबा अगदी सहजपणे मानवी मेंदूत प्रवेश करू शकते. (हेही वाचा - Coronavirus: चीनमुळेच जगातील अनेक देशांची आर्थिक घडी विस्कटली; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप)

हा अमीबा साधारणत: तलाव आणि नदीच्या ताज्या किंवा गरम पाण्यात आढळतो. आरोग्य विभागाने नागरिकांना अशा ठिकाणच्या पाण्यात उतरताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: पाण्यात पोहताना नाकाला पाण्याचा संपर्क होऊ देऊ नये. हा अमीबा नाकाच्या साहाय्याने मेंदूत प्रवेश करू शकतो. जर स्विमिंग पूलच्या पाण्याचे तापमान जास्त असेल तर त्यामध्ये उतरण्याची चूक करू नका, असं आवाहनदेखील फ्लोरिडातील आरोग्य विभागाने केलं आहे.

दरम्यान, फ्लोरिडा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत 1967 ते 2017 या कालावधीत अमीबाची लागण झालेल्या 143 घटना समोर आल्या होत्या. त्यापैकी केवळ चारजणांचे प्राण वाचले होते. मार्च ते ऑगस्ट दरम्यान हवामानाचे तापमान जास्त असते. त्यानंतरचं या अमीबाचा धोका आणखी वाढतो. नेगलेरिया फोवलेरीचा संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या ही लक्षणं आढळतात. त्यानंतर काही दिवसांत यात आणखी वाढ होऊन अटॅक, मानसिक स्थितीत बदल आणि कोमा अशी लक्षणं दिसून येतात.