Bone Smashing Trend on TikTok: आकर्षक दिसण्यासाठी लोक हातोड्याने तोडत आहेत स्वतःच्या चेहऱ्याची हाडे; टिकटॉकवर ‘बोन स्मॅशिंग’ ट्रेंड व्हायरल, जाणून घ्या सविस्तर
Bone Smashing Trend (Photo Credit: X/ @renmusb1)

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी युजर्स अनेक चित्र-विचित्र गोष्टी करतात. भरपूर लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी काहीजण तर आपला जीवही धोक्यात घालतात. आता काही टिकटॉक (TikTok) युजर्स अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यावर हातोड्याने वार करत आहेत. सध्या ‘बोन स्मॅशिंग’ (Bone Smashing) नावाचा हा ट्रेंड इतका लोकप्रिय ठरत आहे की, टिकटॉकवर हजारो युजर्सनी असे व्हिडिओ बनवले आहेत. या व्हिडिओजमध्ये ते स्वतःच्या चेहऱ्यावर हातोड्याने मारताना दिसत आहेत. थोडक्यात टिकटॉकवर लोकप्रियता मिळवण्यासाठी युजर्स त्यांच्या चेहऱ्याची हाडे मोडत आहेत

या ‘बोन स्मॅशिंग’ ट्रेंडमध्ये लोक मुद्दाम त्यांची हाडे मोडतात आणि त्यांच्या चेहऱ्याचा आकार बदलतात. याद्वारे ते एक विचित्र चेहरा प्राप्त करतात. चेहऱ्याची हाडे मोडून आपण वेगळाच लूक घेतलाय हे दाखवण्यासाठी लोक हाडे तोडण्याआधीचा आणि नंतरचा फोटो पोस्ट करत आहेत. महत्वाचे म्हणजे काही लोक ‘वुल्फ’ सिद्धांताचा हवाला देत, अशा प्रकारे हाडे मोडण्याच्या प्रवृत्तीला न्याय देत आहेत.

वुल्फचा सिद्धांत 1800 व्या शतकात ज्युलियस वुल्फ नावाच्या जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि सर्जनने तयार केला होता. हा सिद्धांत या पद्धतीवर आधारित आहे की, हाडांची स्थिर संरचना नसून ती गतिमान असते, ज्यांचे सतत पुनर्निर्मिती होत असते. या नियमानुसार जुनी किंवा तुटलेली हाडे दुरुस्त करून त्यांच्या जागी नवीन हाडे येत राहतात. हाडांवर ताण दिल्यास रीमॉडेलिंगचे प्रमाण वाढू शकते आणि असे केल्याने हाडे मजबूत आणि जाड होऊ शकतात. नाहीतरी हाडे पातळ किंवा कमकुवत होऊ शकतात. (हेही वाचा: VIDEO: रेल्वे रुळावर उभे राहून रील बनवत होता तरुण; मागून ट्रेनने दिली धडक, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ)

काही लोकांनी यासाठी जिममध्ये वजन उचलण्याच्या पद्धतीचा हवाला दिला आहे. त्यांच्या मते वजन उचलण्याच्या व्यायामामुळे हाडे मजबूत होतात. तसेच हाडांवर हातोडा मारल्यानेही ती कमकुवत होण्याची शक्यता कमी होते. परंतु हातोड्यासारख्या गोष्टीने चेहऱ्यावर मारल्याने तुम्ही अधिक आकर्षक दिसाल असा कोणताही पुरावा किंवा अभ्यास नाही. किंबहुना, ‘हाडे तोडण्याचे’ तत्त्व हे  वुल्फच्या कायद्यापेक्षा वेगळे आहे. चेहऱ्यावर अशा प्रकरणे हातोड्याने मारल्याने फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो आणि चेहऱ्याचे कायमचे मोठे नुकसान होऊ शकते. हाडे तुटल्यानंतर ती बरी होऊ शकतात, परंतु ती योग्यरित्या बरी होतील असे नाही.

(टीप- हा लेख इंटरनेटवरील माहितीच्या आधारे लिहिला आहे. लेटेस्टली मराठी अशा कोणत्याही ट्रेंडचे समर्थन करत नाही.)