Barclays Layoffs: बार्कलेजमध्ये होणार नोकर कपात; 2000 लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, भारतीय कर्मचाऱ्यांवरही होणार परिणाम? घ्या जाणून

रॉयटर्सच्या बातम्यांनुसार, बार्कलेज दीर्घकालीन किरकोळ आणि गुंतवणूकीच्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी टाळेबंदीचा पर्यायही अवलंबला जात आहे. यासोबतच बँकेने कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही कपात केली आहे.

Barclays Layoffs: बार्कलेजमध्ये होणार नोकर कपात; 2000 लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, भारतीय कर्मचाऱ्यांवरही होणार परिणाम? घ्या जाणून
Barclays (Photo Credit: X/IANS)

यूकेची बहुराष्ट्रीय बार्कलेज बँक (Barclays Bank) मोठ्या नोकरकपातीची तयारी करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 1 अब्ज पौंड किंवा 1.25 अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करण्यासाठी बँक किमान 2,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते. बार्कलेज बँक ही जगातील 10वी सर्वात मोठी बँक आहे आणि तिचे 81,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. बँकेची स्थापना 333 वर्षांपूर्वी 1690 मध्ये झाली.

बार्कलेज बँकेत मोठ्या प्रमाणावर टाळेबंदीच्या बातम्या येत असताना, भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल का?, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बार्कलेज बँकेच्या या छाटणीचा परिणाम प्रामुख्याने ब्रिटीश बँकेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे. बँकेचे व्यवस्थापक आढावा घेण्याच्या कामात व्यस्त असून कंपनीने आपली खर्चात कपात करण्याची पुढे रेटल्यास किमान 1500 ते 2000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

या प्रकरणाची माहिती देताना, बार्कलेजचे सीईओ सीएस वेंकटकृष्णन यांनी सांगितले की, बँक येत्या काही दिवसांत एकूण अब्जावधी पौंडांच्या खर्चात कपात करण्याचा विचार करत आहे. या कपातीचा सर्वाधिक परिणाम बार्कलेज एक्झिक्युशन सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होईल, ज्यांना BX म्हणून ओळखले जाते.

अलिकडच्या वर्षांत BX चे कर्मचारी आणि खर्च लक्षणीय वाढले आहेत. नियामक फाइलिंग दर्शविते की 2017 च्या शेवटी 20,000 कर्मचारी होते, जे 2022 च्या अखेरीस अंदाजे 22,300 पर्यंत वाढले आहे. सध्या BX कर्मचारी हे बार्कलेजच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त आहेत. यासह BX मधील वार्षिक कर्मचारी खर्च £1.8bn वरून £2bn पर्यंत वाढला आहे. (हेही वाचा: Three-Day Work Week: 'तीन दिवसांचा कामाचा आठवडा शक्य, जीवनाचा उद्देश फक्त नोकरी नाही'- Bill Gates)

रॉयटर्सच्या बातम्यांनुसार, बार्कलेज दीर्घकालीन किरकोळ आणि गुंतवणूकीच्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी टाळेबंदीचा पर्यायही अवलंबला जात आहे. यासोबतच बँकेने कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही कपात केली आहे. या छाटणीद्वारे बँकेला आपला खर्च ते उत्पन्न गुणोत्तर सुधारायचे आहे व हे सीईओ सीएस वेंकटकृष्णन यांच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2023 05:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).