Azerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद  
Map showing areas of Azerbaijan, Nagorno Karabakh and Armenia | (Photo Credits: Wikimedia Commons)

अर्मेनिया (Armenia) आणि अझरबैजान (Azerbaijan) यांच्यात युद्धाची आग सुरू झाली आहे. यामध्ये तब्बल 24 लोक ठार झाले असून, 100 हून अधिक जखमी झाले आहेत. फर्स्ट पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे. हा लढा सीमा विवादांविषयी आहे. याआधी ‘सीमा विवादा’मुळे जगातील अनेक देशांमध्ये लढाया झाल्या आहेत व त्यामध्ये अक्षरशः रक्ताचे पाट वाहिले आहेत. आता सध्याच्या काळात अर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यानही हेच घडत आहे. रविवारी फुटीरतावादी नागोरोनो काराबाख (Nagorny Karabakh) परिसरावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला. दरम्यान, तुर्कीचे अध्यक्ष Recep Tayyip Erdoğan यांनी आर्मेनियाला धमकी देत ​​अझरबैजानला खुले समर्थन जाहीर केले आहे.

आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये नागोरोनो-काराबाख प्रदेशाबाबत बराच काळ लढा सुरू होता, परंतु रविवारी त्याचे युद्धामध्ये रूपांतर झाले. मात्र, हे भांडण नक्की का सुरू झाले याची माहिती समोर आली नाही. परंतु हा लढा दोन्ही देशांमधील सर्वात मोठा लढा मानला जात आहे. अर्मेनियाचा असा दावा आहे की अझरबैजानच्या सैन्याने गोळीबार केला ज्यामध्ये एक महिला आणि मुलाची हत्या झाली. तर अझरबैजानचे अध्यक्ष असा दावा करत आहे की, यामध्ये त्यांच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अर्मेनियाचे म्हणणे आहे की यामध्ये त्यांनी दोन अझरबैजान हेलिकॉप्टरला पाडले आणि तीन टँकना लक्ष्य केले, तर अझरबैजानच्या संरक्षणमंत्र्यांनी ही गोष्ट नाकारली आहे. नागोरोनो-काराबाख अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अझरबैजान राजधानी स्टेपनासेर्ट, मार्टकार्ट आणि मार्टुनी शहरात घुसले. आता अझरबैजानच्या काही भागात मार्शल कायदा लागू करण्यात आला आहे आणि काही प्रमुख शहरांमध्ये कर्फ्यूचे आदेशही देण्यात आले आहेत.

Erdoğan यांनी या क्रौर्य विरोधी लढाईत जागतिक समुदायाला सामील होण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, अर्मेनियाचे जुने सहयोगी रशियाने त्वरित युद्धबंदीची घोषणा करण्यासाठी आणि परिस्थिती स्थिर करण्यासाठी चर्चेची मागणी केली आहे. दरम्यान, जुलैच्या सुरुवातीलाही दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांशी भिडले होते, ज्यामध्ये एकूण 16 जणांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा)

नक्की काय आहे वाद –

जेव्हा बरेच देश आपापसात भांडतात तेव्हा त्यामागे प्रमुख कारण हे सीमा वाद असते. अर्मेनिया आणि अझरबैजानमध्येही असेच काहीसे घडले आहे. 4400 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या नागोरोनो काराबाख क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांमध्ये भांडत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी, नागोरोनो-काराबाख प्रदेश हा अझरबैजानचा भाग असला, तरी अर्मेनियाच्या वांशिक गटांनी तो व्यापला आहे. यानंतर, 1991 मध्ये, स्वतः नागोरोनो-काराबाखच्या लोकांनी हा भाग अर्मेनियाचा असल्याचा दावा केला आणि त्यांनी अझरबैजानपासून विभक्त झाल्याची घोषणा केली. मात्र, अझरबैजानने ही घोषणा नाकारली व तेव्हापासून हा लढा सुरूच आहे.