काही देशांसोबत चीनचे (China) संबंध बऱ्याच काळापासून चांगले राहिले नाहीत. आता चीनमधील सरकारने झिनजियांग (Xinjiang) प्रांतातील 16 हजाराहून अधिक मशिदी (Mosques) उद्धवस्त केल्याची एक नवीन बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन थिंक टँकने (Australian Think Tank) शुक्रवारी जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. या भागात मानवाधिकार कसे चिरडले जात आहेत याविषयीही या अहवालात नमूद केले आहे. थिंक टँकने म्हटले आहे की 1 लाखाहून अधिक उईगर आणि इतर मुस्लिमांना उत्तर-पश्चिम प्रांतातील छावणीत कैद केले गेले आहे. झिनजियांग प्रांतात लोकांवर त्यांचे पारंपारिक आणि धार्मिक उपक्रम सोडून देण्यासाठी दबाव आणला जात आहे.
ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट (ASPI) च्या म्हणण्यानुसार सुमारे 16,000 मशिदी पाडल्या गेल्या किंवा खराब केल्या गेल्या आहेत. हा अहवाल उपग्रह प्रतिमा आणि स्थिर मॉडेलिंगवर आधारित आहे. गेल्या तीन वर्षांत बहुतेक मशिदींची तोडफोड करण्यात आली असल्याचे अहवालात म्हटले आहे. एका अंदाजानुसार 8,500 मशिदी पूर्णपणे पाडल्या गेल्या आहेत. सर्वाधिक नुकसान उरुमकी आणि काश्गरच्या बाहेरील भागात झालेले आहे. पुष्कळ मशिदी पूर्णपणे पाडल्या गेलेल्या नाहीत, त्यांचे घुमट व मिनारे तोडण्यात आले. झिनजियांगमधील नुकसान झालेल्यांपैकी सुमारे 15,500 मशीद वाचल्या आहेत.
हे जर खरे असल्यास, 1960 च्या दशकात सांस्कृतिक क्रांतीतून उद्भवलेल्या राष्ट्रीय उलथापालथानंतरच्या या प्रदेशातील मुस्लिम लोकांच्या मशिदींची ही सर्वात कमी संख्या आहे. याउलट, अभ्यासात समाविष्ट असलेल्या कोणत्याही चर्च आणि बौद्ध मंदिरांना नुकसान झाले नसल्याचे थिंक टँकने म्हटले आहे. एएसपीआयने असेही म्हटले आहे की, झिनजियांगमधील मुस्लिमांची दर्गा, दफनभूमी आणि तीर्थक्षेत्रांसह एक तृतीयांश स्थळे हटविली गेली आहेत. गेल्या वर्षी एएफपीच्या तपासणीत असे आढळले की, डझनभर स्मशानभूमी उखडून टाकल्या गेल्या होत्या. यामुळे मानवी अवशेष जमिनीवर विखुरले गेले होते. (हेही वाचा: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा)
दरम्यान, चीनने असा दावा केला आहे की झिनजियांग प्रांतात नागरिकांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य आहे. या अहवालाबद्दल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला विचारले असता, ते म्हणाले की, या संशोधन संस्थेची कोणतीही विश्वसनीयता नाही आणि हा खोटा अहवाल मुद्दाम चीनविरूद्ध तयार केला गेला आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, या भागात 24 हजार मशिदी आहेत. यापूर्वी एएसपीआयने म्हटले आहे की त्याने या प्रांतातील एक मोठे डिटेंशन सेंटरचे जाळे शोधून काढले आहे. पूर्वीच्या अंदाजापेक्षा ही संख्या खूप जास्त आहे. बीजिंगने म्हटले आहे की, ही शिबिरे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे आहेत जी गरिबी व कट्टरतेविरूद्ध लढण्यासाठी आवश्यक आहेत.