GDP | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

पाकिस्तान अर्थव्यवस्थेबाबतीत (Pakistan Economy)  2019-20 मध्ये, 68 वर्षात प्रथमच मोठी घसरण झाली आहे. 11 जून रोजी सादर करण्यात आलेल्या आर्थिक आढावामध्ये असे म्हटले आहे की, या कालावधीत पाकिस्तानच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 0.38 टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजेच वाढ शून्याच्या खाली गेली आहे व ती आता नकारात्मक झाली आहे. अर्थविषयक सल्लागार अब्दुल हफीझ शेख यांनी आर्थिक आढावा जारी करत म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये 68 वर्षातील ही पहिलीच इतकी मोठी घसरण आहे. या आढाव्यानुसार कृषी क्षेत्रात 2.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, या व्यतिरिक्त औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात घट दिसून आली. या कालावधीत डॉलरद्वारे दरडोई उत्पन्नही 6.1 टक्क्यांनी घटून 1,366 डॉलरवर गेले. मात्र रुपयाच्या बाबतीत ती वाढून 214,539 रुपयांवर गेली. पाकिस्तान सरकार 12 जून रोजी नवीन अर्थसंकल्प सादर करणार आहे.

करोना व्हायरस मुळे सरकारला मार्चमध्ये कित्येक आठवडे लॉक डाउन लागू करण्यास भाग पाडले आहे. आतापर्यंत सुमारे 120,000 लोकांना पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे संपलेल्या चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम झाला आहे. इकनॉमिक रिव्ह्यूनुसार महामारी होण्यापूर्वीच आर्थिक स्थिरीकरण धोरणांमुळे पाकिस्तानच्या उद्योगांवर परिणाम झाला होता. यासह, कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिणामामुळे अर्थव्यवस्थेने सन 2019-20 मध्ये 0.38 टक्के घट नोंदविली. (हेही वाचा: COVID-19: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना कोरोनाची लागण)

पाकिस्तानी माध्यम डॉन न्यूजच्या मते, महागाई कमी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने व्याज दरात वाढ केली. मात्र त्याचा परिणाम उलट झाला आणि यामुळे खासगी कंपन्यांनी औद्योगिक विकासासाठी महागडे कर्ज घेणे बंद केले. ज्यामुळे देशात आणखी महागाई वाढली आणि देशाचा औद्योगिक विकास दरही कमी झाला. डॉनच्या म्हणण्यानुसार, जानेवारीत पाकिस्तानमध्ये 12 वर्षातील सर्वाधिक महागाई दर पाहायला मिळाला, जो 14.6 टक्क्यांवर गेला.