Privacy Policy संदर्भातील भारताच्या प्रश्नांवर WhatsApp ने दिले स्पष्टीकरण- 'पारदर्शकता आणणे हे आमचे उद्दीष्ट'
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्यानंतर चहूबाजूंनी या अ‍ॅपवर टीका होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या निर्णयानंतर अनेकांनी पर्यायी अ‍ॅपचा वापर करायला सुरुवात केली आहे. फेसबुककडे व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असल्याने, ग्राहकांचा डेटा फेसबुककडे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय वापरकर्त्यांच्या गोपनीयता धोरणातील बदल मागे घेण्यासाठी भारत सरकारने देखील, व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट (Will Cathcart) यांना पत्र लिहिले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने भारताच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, 'प्रस्तावित बदलांमुळे फेसबुकवर डेटा शेअर करण्याची क्षमता वाढणार नाही. पारदर्शकता आणणे हे आमचे उद्दीष्ट आहे.’

मंगळवारी भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT Ministry) व्हॉट्सअ‍ॅपच्या सीईओला एक पत्र लिहून गोपनीयता धोरणाच्या अटींमधील बदलांशी संबंधित 14 प्रश्न विचारले. यावर व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ‘हा बदल फेसबुकसह डेटा शेअर करणार नाही. पारदर्शकता आणणे आणि व्यवसायासाठी गुंतवणूकीचे नवीन पर्याय उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दीष्ट आहे, जेणेकरून ते आपल्या ग्राहकांना सेवा देऊ शकतील आणि ग्रोथ प्राप्त करू शकतील.’ (हेही वाचा: WhatsApp च्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हायकोर्टाचे उत्तर, खासगी ॲप असून पसंद नसल्यास डिलिट करण्याचा दिला सल्ला)

प्रवक्त्याने असेही सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे वैयक्तिक संदेशांचे संरक्षण करेल, जेणेकरून व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक त्यांना पाहू शकणार नाही. प्रवक्ते पुढे म्हणाले, चुकीची माहितीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा इतरही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. भारत सरकारने मंगळवारी व्हॉट्सअॅपला गोपनीयता धोरणात केलेले नवीन बदल मागे घेण्यास सांगितले होते. मंत्रालयाने वापरकर्त्यांच्या माहिती सुरक्षेवर प्रश्न उभा करत म्हटले होते की, व्यवसाय खात्यासह चॅट डेटा शेअर केल्याने फेसबुकच्या इतर कंपन्या वापरकर्त्यांविषयी सर्व माहिती मिळवतील. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ शकतो.