प्रातिनिधिक प्रतिमा

UPI Tap and Pay Date: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) लवकरच युपीआय टॅप ​​आणि पे फिचर (UPI Tap and Pay) सुरू करणार आहे. यामुळे डिजिटल पेमेंट आणखी सोपे होईल. यामध्ये तुम्ही क्यूआर कोड (QR Code) स्कॅन न करता पेमेंट करू शकाल. ही सुविधा 31 जानेवारी 2024 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. एनपीसीआयने यासंदर्भात परिपत्रकही जारी केले आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले की ही सुविधा डिजिटल पेमेंट युजर्सना प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, सेवा पुरवठादारांनी हे फिचर सुरू करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही.

पेमेंट प्रदाते कधीही त्यांच्या अॅप्सवर युपीआय टॅप ​​आणि पे फिचर सुरू करू शकतात. मात्र, एनपीसीआय अशा कंपन्यांशी संपर्क करणे सुरू ठेवेल जे त्यांच्या मुदतीच्या आत ही सेवा सुरू करू शकतील. सध्या ही सुविधा पेटीएम (Paytm) तसेच भारत इंटरफेस फॉर मनी किंवा भीम अॅपवर उपलब्ध आहे, जिथे ती मर्यादित संख्येच्या वापरकर्त्यांसाठी खुली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये इतर नवीन डिजिटल पेमेंट फीचर्ससह युपीआय  टॅप ​​आणि पे फिचर लॉन्च करण्याची घोषणा केली होती.

या फीचरमध्ये कॅमेऱ्याद्वारे क्विक रिस्पॉन्स (QR) कोड कॅप्चर न करता पेमेंट करता येते. या फिचरमध्ये प्राप्तकर्त्याचा युपीआय आयडी किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) बद्दल तपशील कॅप्चर करण्यासाठी निअर-फील्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. एनफीसी क्षमता असलेले मोबाईल आणि उपकरणे ही सेवा वापरू शकतात. मात्र युपीआय टॅप ​​आणि पे सेवेचा विस्तार करण्यासाठी, व्यापाऱ्यांकडे युपीआय स्मार्ट क्यूआर किंवा टॅग असणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Chameleon Android Malware Alert: अँड्रॉइडमध्ये आला धोकादायक मालवेअर; चोरत आहे तुमच्या फोनचा पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक)

एनपीसीआयने आपल्या परिपत्रकात युपीआयला पेमेंट अॅपच्या होमपेजवर सोयीसाठी स्वतंत्र कॉल-टू-ऍक्शन बटण असण्याची शिफारस केली आहे. हे अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवरील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. जर वापरकर्ता टॅप सुविधेसाठी UPI LITE वापरत असेल, तर तो 500 रुपयांपेक्षा कमी किमतीचे व्यवहार करू शकेल. 500 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी युपीआय पिन आवश्यक असेल. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये युपीआय व्यवहारांनी मूल्यात नवा उच्चांक गाठला. ऑक्टोबरमधील 17.16 ट्रिलियन रुपयांच्या तुलनेत ते 1.4 टक्क्यांनी वाढून 17.40 ट्रिलियन रुपयांवर पोहोचले. त्याचप्रमाणे, त्यात 11.24 अब्ज व्यवहारांची नोंद झाली, जी ऑक्टोबरमधील 11.41 अब्जच्या विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत किरकोळ घट आहे.