Tata iPhones: आता भारतामध्ये टाटा ग्रुप करणार 'आयफोन'ची निर्मिती; तैवानची कंपनी विस्ट्रॉनशी करार पूर्ण
Apple iPhone 14

तंत्रज्ञानाच्या मक्तेदारीचा दावा करणाऱ्या चीनला मोठा झटका बसला आहे, कारण आता भारतामध्ये आयफोनची (Iphone) निर्मिती होणार आहे. टाटा समूह (Tata Group) भारतात आयफोन बनवणार आहे. टाटा समूहाने भारतात आयफोन असेंबल करणारा विस्ट्रॉन प्लांट विकत घेतला आहे. अॅपल पुरवठादार विस्ट्रॉनचा कारखाना ताब्यात घेण्याचा करार शुक्रवारी अंतिम झाला. विस्ट्रॉनच्या संचालक मंडळाने शुक्रवारी या विक्रीला मंजुरी दिली. आतापासून, आयफोनचे उत्पादन टाटा समूहाद्वारे भारतात केले जाईल आणि असेंबल केले जाईल, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी 27 ऑक्टोबर रोजी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X द्वारे दिली.

अहवालानुसार, विस्ट्रॉनच्या कारखान्याचे मूल्य अंदाजे $125 दशलक्ष इतके आहे. टाटा समूह आणि विस्ट्रॉन यांच्यात गेल्या एक वर्षापासून या करारासाठी चर्चा सुरू आहे. विस्ट्रॉनचा हा प्लांट आयफोन-14 मॉडेलच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. सध्या या प्लांटमध्ये 10,000 हून अधिक कामगार काम करतात. तैवानची कंपनी विस्ट्रॉनने 2008 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यावेळी कंपनी अनेक उपकरणांसाठी दुरुस्ती सुविधा पुरवत होती. यानंतर, 2017 मध्ये, कंपनीने आपल्या कार्याचा विस्तार केला आणि Apple साठी आयफोनचे उत्पादन सुरू केले.

एका मीडिया रिपोर्टनुसार, ऍपलच्या अटींनुसार नफा मिळविण्याच्या आव्हानांमुळे विस्ट्रॉनने भारतातील आयफोन असेंबली कारखाना विकण्याचा निर्णय घेतला. भारतातील एकमेव आयफोन असेंब्ली प्रदाता म्हणून कंपनीला नफा मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. टाटाच्या अधिग्रहणानंतर, विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल. गेल्या वर्षी कॅलिफोर्नियाची कंपनी Apple ने चीन आणि अमेरिका यांच्यातील वादामुळे जगभरातील सुमारे 25% उत्पादन भारतात हलवण्याची योजना जाहीर केली होती. (हेही वाचा: स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर लक्ष द्या! लवकरच OnePlus आणि Realme बंद करू शकतात त्यांचा भारतातील व्यवसाय- Reports)

दरम्यान, टाटा समूह मीठ विकण्यापासून ते तांत्रिक सेवा पुरविण्यापर्यंत अनेक प्रकारच्या व्यवसायात गुंतलेला आहे. अलीकडच्या वर्षांत, समूहाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रवास सुरू केला आहे. समूह सध्या तामिळनाडू राज्यातील त्यांच्या कारखान्यात आयफोन चेसिस तयार करतो, जे डिव्हाइसची मेटल बॉडी बनवते. याव्यतिरिक्त, चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी यापूर्वी चिपमेकिंग व्यवसायात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.