तुम्ही जर वनप्लस आणि रियलमीचे (OnePlus and Realme) चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. या सणासुदीच्या हंगामात तुम्ही वनप्लस आणि रियलमी स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अलीकडेच काही बातम्या समोर आल्या आहेत ज्यानुसार हे दोन्ही ब्रँड त्यांचे स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारातून काढून टाकू शकतात. मात्र याबाबत वनप्लस आणि रियलमीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, या दोन मोठ्या स्मार्ट टीव्ही ब्रँड्सनी भारतातून बाहेर पडण्याची योजना आखली आहे. दोन्ही स्मार्ट टीव्ही कंपन्यांनी त्यांचे उत्पादन बंद केले आहे. याशिवाय स्मार्ट टीव्हीच्या विक्रीलाही ब्रेक लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, वनप्लस आणि रियलमी भारतात स्मार्ट टीव्ही बनवण्याचा व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. मात्र, स्मार्टफोनचा व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
वनप्लस आणि रियलमीने स्मार्ट टीव्ही व्यवसाय बंद करण्याचा निर्णय का घेतला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही कंपन्यांनी स्मार्ट टीव्हीच्या ब्रँडिंग आणि विक्रीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. वनप्लसद्वारे भारतात परवडणारा स्मार्ट टीव्ही सादर केला जात होता. वनप्लसकडून 2020 मध्ये, कडून पहिला टीव्ही भारतात लाँच झाला. वनप्लसने या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रीमियम स्मार्ट टीव्ही श्रेणीत प्रवेश केला, तर परवडणाऱ्या स्मार्ट टीव्ही श्रेणीमध्ये कंपनीचा मोठा वाटा होता. (हेही वाचा: Google ने धोरणांच्या उल्लंघनाचे कारण देत YouTube वरून हटवले 20,00,000 व्हिडीओ)
वनप्लस हा भारतातील स्मार्ट टीव्ही विभागातील चौथा सर्वात मोठा ब्रँड आहे आणि अशा वेळी या विभागातून बाहेर पडणे हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे. असे मानले जाते की वनप्लस आणि रियलमी या दोन्ही ब्रँडला शाओमी स्मार्ट टीव्हीकडून जोरदार स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, सध्या भारतात स्मार्ट टीव्हीची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. या विभागात दरवर्षी 28 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. भारतामध्ये 32 इंच आणि 42 इंच स्मार्ट टीव्हींना सर्वाधिक मागणी आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा 71 टक्के आहे. तर गेल्या एका वर्षात 55 इंची स्मार्ट टीव्हीची मागणी वाढली असून ती 9 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर पोहोचली आहे.