Zero Shadow Day In Bengaluru: बेंगळुरूमध्ये उद्या नाहीशी होईल सर्व गोष्टींची सावली; जाणून घ्या काय आहे झिरो शॅडो डे
Zero Shadow Day In Bengaluru (संग्रहित संपादित प्रतिमा)

बेंगळुरू (Bengaluru) शहर हे 25 एप्रिल रोजी एका अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार होणार आहे. उद्या काही काळासाठी शहरात कोणत्याही वस्तूची सावली दिसणार नाही. या दिवसाला झिरो शॅडो डे (Zero Shadow Day) असे म्हटले जाते. ही घटना दुपारी 12.17 वाजता घडणार आहे. बंगळुरूमधील कोरमंगला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) या प्रसंगी आपल्या कॅम्पसमध्ये कार्यक्रम आयोजित करणार आहे. बेंगळुरूमधील अनेक रहिवासी या कार्यक्रमाचे फोटो ट्विट करत आहेत.

ही गोष्ट अशा वेळी घडते जेव्हा जेव्हा दिवसाच्या एका विशिष्ट वेळी सूर्य आपल्या डोक्यावर अगदी वर येतो, ज्यामुळे कोणाचीही सावली तयार होत नाही, म्हणूनच या स्थितीला झिरो शॅडो म्हणतात.

अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) ने म्हटले आहे की उष्ण कटिबंधातील (कर्क व मकर उष्ण कटिबंधातील) ठिकाणांसाठी झिरो शॅडो डे वर्षातून दोनदा येतो. एएसआयने सांगितले की, पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष सूर्याभोवतीच्या त्याच्या कक्षेच्या समतलतेकडे 23.5 अंशांनी झुकलेला असतो, ज्यामुळे वेगवेगळे ऋतू येतात. म्हणजेच इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी देखील 23.5 अंशांवर झुकलेली आहे. झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणे एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात.

याचा अर्थ असा की, सूर्य दिवसाच्या सर्वोच्च बिंदूवर, एका वर्षात खगोलीय विषुववृत्ताच्या 23.5 अंश दक्षिणेकडून विषुववृत्ताच्या (उत्तरायण) 23.5 अंश उत्तरेकडे जातो आणि पुन्हा (दक्षिणायन) परत येतो. या फिरत्या हालचालीमुळे, एक झिरो शॅडो डे हा उत्तरायण (जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकतो) वेळी येतो आणि दुसरा दक्षिणायन (जेव्हा सूर्य दक्षिणेकडे सरकतो) वेळी येतो. (हेही वाचा: Chandra Grahan 2023 Date and Time: लवकरच होणार वर्षातील पहिले चंद्र ग्रहण; जाणून घ्या तारीख आणि वेळ)

ही घटना अवघे काही सेकंदापुरतीच मर्यादित आहे, परंतु त्याचा परिणाम दीड मिनिटापर्यंत दिसून येतो. ओडिशातील भुवनेश्वरने देखील 2021 मध्ये झिरो शॅडो डे अनुभवला आहे.