Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

Solar Eclipse 2024: येत्या 8 एप्रिल 2024 रोजी चैत्र अमावस्येला सूर्यग्रहण (Solar Eclipse) होणार आहे. 2024 सालातील हे पहिले सूर्यग्रहण असेल. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. 8 एप्रिल 2024 रोजीचे सूर्यग्रहण रात्री 09:12 ते मध्यरात्री 2.22 मिनिटांपर्यंत राहील. हे सूर्यग्रहण मीन, स्वाती नक्षत्रात होईल. तज्ञांच्या मते, सुमारे 7 मिनिटे सूर्य दिसणार नाही. हे यापूर्वी 1970 मध्ये घडले होते.

सूर्य सूर्यमालेत स्थिर आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि तो सूर्याभोवतीही फिरतो. या काळात अनेक वेळा असा प्रसंग येतो जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो. त्यामुळे सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश काही काळ खंडित होतो. याला सूर्यग्रहण म्हणतात. ही घटना अवकाशातून पाहिल्यास पृथ्वीवर एक मोठी सावली दिसेल, जी चंद्राची असते.

हे सूर्यग्रहण कुठे दिसणार?

सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, केंटकी, ओहायो, न्यूयॉर्क, पश्चिम युरोप, उत्तर दक्षिण अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक, आर्क्टिक इत्यादी अनेक ठिकाणी दिसणार आहे. हे संपूर्ण सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही. हिंदू धर्मग्रंथानुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. या स्थितीत सकाळी 9.12 पासून सुतक कालावधी सुरू होईल, ज्याची समाप्ती ग्रहण समाप्तीसह होईल. पण सुतक काळ भारतात वैध असणार नाही. त्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद होणार नाहीत. (हेही वाचा: Chandrayaan-4 Mission: इस्रो पुन्हा इतिहास रचणार, 2028 मध्ये चंद्रावरून माती आणण्यासाठी चांद्रयान-4 प्रक्षेपित केले जाणार)

सर्वसाधारणपणे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत- 

खग्रास सूर्यग्रहण: जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

खंडग्रास सूर्यग्रहण: जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या पाठीमागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण: जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते.