Perseid Meteor Shower 2021: आकाशातील आतषबाजी पाहण्यास सज्ज व्हा; आज रात्री होणार उल्का वर्षाव, जाणून घ्या कधी व कुठे दिसणार
Representational Image (Photo Credits: Pixabay)

आकाश, चंद्र, तारे म्हणजेच खगोलशास्त्रमध्ये (Astronomy) रस असलेल्या जगभरातील लोकांसाठी हा आठवडा खूप खास ठरणार आहे. आज आकाशात चहुबाजूंनी आगीचे गोळे दिसतील, ज्यामुळे आकाशात आतषबाजी होत असल्याचा भास होईल. आज आकाशात पर्सीड उल्का वर्षाव (Perseid Meteor Shower 2021) पाहण्याची संधी मिळू शकते. यूएस स्पेस एजन्सी नासाने 26 जुलै रोजी आपल्या उल्का-ट्रॅकिंग कॅमेराद्वारे हा अंदाज वर्तवला होता. आपण 11 ऑगस्टच्या रात्री आकाशात उल्का वर्षावाचे दृश्य पाहू शकता. 12 ऑगस्टच्या पहाटेच्या आधी हा वर्षाव त्याच्या शिखरावर असेल. नासाने सांगितले होते की हा यंदाचा सर्वात मोठा उल्कावर्षाव असेल.

ही एक प्रकारची खगोलशास्त्रीय घटना आहे, ज्याला पर्सीड्स उल्का वर्षाव म्हणून ओळखले जाते. जेव्हा धूमकेतु स्विफ्ट-टटल पृथ्वीजवळून जातो तेव्हा त्याचे कण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा ही खगोलीय घटना घडते. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास हा वर्षाव सुरू होईल आणि गुरुवार 12 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते 5 दरम्यान हा उल्कापात पीकवर असेल.

हा उल्का वर्षाव संपूर्ण आठवड्यात कमी -अधिक प्रमाणात होत राहील. पर्सीड उल्कावर्षाव 14 जुलैपासून सुरू झाला. 24 ऑगस्ट पर्यंत, आकाशातून उल्काचे छोटे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील. ईशान्य प्रदेशातील आकाशात हे दृश्य पाहिले जाऊ शकते. उल्कावर्षाव पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात चांगल्या प्रकारे दिसेल. भारतही या गोलार्धात येतो. (हेही वाचा: Space Tourism: कोट्टायमचे Santhosh George बनणार भारतामधील पहिले अंतराळ पर्यटक; 2007 मध्येच बुक केली होती सीट)

लुईस स्विफ्ट (Lewis Swift)आणि होरेस टटल (Horace Tuttle) यांनी 1862 मध्ये धूमकेतू स्विफ्ट-टटलचा शोध लावला. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला 133 वर्षे लागतात. ज्या ठिकाणी प्रदूषण कमी असेल आणि आकाश निरभ्र असेल तेथे हे अद्भुत दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकते. डेली मेलच्या अहवालानुसार, यूकेमध्ये तर दर तासाला 40 तुटणारे तारे दिसू शकतात.

हे दृश्य ऑनलाईन पाहण्यासाठी नासाद्वारे लिंक्स शेअर केल्या आहेत-

https://go.nasa.gov/3lVdz5g

आपण नासाच्या फेसबुक पेजवरही हे दृश्य पाहू शकता-

https://www.facebook.com/NasaMeteorWatch/

दरम्यान, दरवर्षी 17 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान पृथ्वी स्विफ्ट टटल धुमकेतूच्या मार्गाने प्रवास करते. जेव्हा पृथ्वी या मार्गावरच्या सर्वात दाट आणि धूळ भरल्या भागातून प्रवास करते तेव्हा जास्त उल्का दिसतात. 2016 मध्ये या काळात ताशी 150-200 उल्का पडताना दिसल्या होत्या.