Santhosh George (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या काही दिवसांपासून अंतराळ पर्यटनाला (Space Tourism) अचानक जोरदार चालना मिळत असल्याचे दिसत आहे. लोकांनीही अंतराळ पर्यटनामध्ये रस दाखवला असून, या प्रवासाबद्दलही ते उत्सुक असल्याचे दिसत आहे. नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि व्हर्जिन गॅलॅक्टिकचे रिचर्ड ब्रॅन्सन स्पेस वॉकवरून परत आले आहेत, आता लवकरच भारताचे संतोष जॉर्ज कुलंगारा (Santosh George Kulangara) देखील अंतराळ प्रवासाची तयारी करणार आहेत. अंतराळ प्रवासाला जाणारे ते पहिले भारतीय असतील.

कोट्टायम मधील मारंगट्टुपल्ली येथील 49 वर्षीय संतोष यांनी आतापर्यंत 130 देशांना भेटी दिल्या आहेत. 2007 मध्येच त्यांनी जवळपास 2.5 लाख डॉलर्समध्ये अवकाशात प्रवास करण्यासाठी आपली सीट बुक केली होती. त्यांनी व्हर्जिन गॅलॅक्टिकमध्ये ही सीट बुक केली आहे. या उड्डाणाबाबत संतोष जॉर्ज म्हणतात की, व्हर्जिन गॅलॅक्टिकचे रिचर्ड ब्रॅन्सन यांचा अंतराळ प्रवास दर्शवितो की आता अवकाशातील व्यावसायिक उड्डाणेदेखील लवकरच सुरू होऊ शकतात.

ते पुढे म्हणतात, पृथ्वी ही पुढील शंभर वर्षात राहण्यायोग्य जागा असेल की नाही, हे माहित नाही. हवामान बदल आणि साथीच्या रोगामुळे जीवनमान खालावत आहे. अशा परिस्थितीत इतर ग्रहांवर वसाहती बसवण्याचे काम लवकरच सुरू होऊ शकेल. संतोषने सांगितले की ते या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस अंतराळात जाऊ शकतात. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजवळ 10 युएफओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचा दावा; Aliens च्या अस्तित्वाबाबत चर्चेला उधाण (Watch Video))

संतोषने अंतराळात जाण्यासाठी अमेरिकेतील व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या स्पेसपोर्ट येथे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणाची किंमत अडीच दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. संतोषला या प्रकल्पाची साप्ताहिक माहिती दिली जाते. अंतराळात जाण्यासाठी त्यांची विविध मापदंडांच्या आधारे निवड केली जाईल. संतोष यांची ‘लेबर इंडिया’ नावाची एक प्रकाशन संस्था असून, ते ‘सफारी टीव्ही’ नावाची वाहिनीही चालवतात.