![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/02/MOON-380x214.jpg)
नासाच्या (NASA) शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले आहे, ज्यामुळे भविष्यात चंद्राच्या (Moon) मातीतून ऑक्सिजन काढणे शक्य होणार आहे. हे केवळ चंद्र मोहिमेसाठीच नव्हे तर इतर अवकाश मोहिमांसाठीही मोठे यश आहे. चंद्रावर ऑक्सिजन नाही, त्यामुळे शास्त्रज्ञांना त्यांच्या मोहिमेसाठी तेथे जास्त काळ राहण्याची व्यवस्था करणे अवघड आहे. मात्र चंद्रावर ऑक्सिजन उपलब्ध असेल, तर तेथे दीर्घकाळ राहून अवकाशातील अनेक रहस्ये शोधून काढता येतील. आता शास्त्रज्ञांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
चंद्राच्या मातीतून ऑक्सिजन काढता आला, तर तिथे मानवी वसाहतीही वसवता येतील. नासाच्या शास्त्रज्ञांनी या दिशेने काम पुढे नेले आहे. जर चंद्रावरच ऑक्सिजनची व्यवस्था केली गेली, तर तेथे मानवी जीवन शक्य आहे, त्या ऑक्सिजनचा उपयोग प्रणोदक म्हणूनही पलीकडच्या जगातल्या क्रियाकलापांना चालना देण्यासाठी होऊ शकतो. नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमधील शास्त्रज्ञांना चंद्राच्या कृत्रिम मातीतून ऑक्सिजन काढण्यात यश आले आहे.
पहिल्यांदाच हे शून्य वातावरणात करण्यात आले असून, एक दिवस असाही येईल जेव्हा चंद्राची माती ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत बनेल असे शास्त्रज्ञांना वाटते. नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या कृत्रिम मातीतून ऑक्सिजन काढण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या गोलाकार कक्षेचा वापर केला. त्याचा व्यास 15 फूट आहे, ज्याला डर्टी थर्मल व्हॅक्यूम चेंबर म्हणतात. या चाचणीसाठी, शास्त्रज्ञांनी चंद्रावर आढळते अगदी तशी परिस्थिती तयार केली. (हेही वाचा: Halo Around Moon: चंद्राभोवती निर्माण झाले तेजस्वी वलय; प्रभामंडल पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित)
नासाच्या मते, येथे डर्टी म्हणजे अशुद्ध नमुने. यूएस स्पेस एजन्सीने या चाचणीबद्दल सांगितले की, 'टीमने कृत्रिम उष्णतेसाठी सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटरच्या उच्च-शक्तीच्या लेसरचा वापर केला आणि चंद्राची कृत्रिम माती कार्बोथर्मल रिअॅक्टरमध्ये वितळवली. जसजशी माती गरम होत गेली, तसतसे टीमला मास स्पेक्ट्रोमीटर ऑब्झर्व्हिंग लूनर ऑपरेशन (MSolo) उपकरणाद्वारे कार्बन मोनोऑक्साइड आढळला.