Longest Day of The Year: 21 जून असेल वर्षातील सर्वात मोठा दिवस, सावली होईल गायब; जाणून घ्या कारण
Sun | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशात 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस (Longest Day of The Year) असतो. यासोबतच 21 जूनची रात्र वर्षातील सर्वात लहान रात्र असते. या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर सर्वात जास्त काळ पडतात. सूर्याची किरणे पृथ्वीवर सुमारे 15 ते 16 तास राहतात. म्हणूनच या दिवसाला वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हटले जाते. 21 जून 2022 रोजी मध्यान्हाच्या वेळी सूर्य कर्कवृत्तावर असेल. पृथ्वीवरील दिवस सकाळी लवकर सुरु होईल तर सूर्यास्त उशिरा होईल. विशेष म्हणजे या दिवशी असाही क्षण येतो जेव्हा तुमची सावली तुमची साथ सोडते.

21 जून रोजी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो. त्यामुळे पृथ्वीचा उत्तर धृव हा 21 जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो. त्यामुळे 21 जून रोजी उत्तर गोलार्धात असणाऱ्या सर्वच देशांमध्ये आजच्या दिवशी दिवस सर्वात मोठा आणि रात्र सर्वात लहान असते. आतापर्यंत फक्त एकदा 1975 रोजी 22 जूनला सर्वात मोठा दिवस होता. त्यानंतर हे 2203 ला होणार आहे.

या दिवशी सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी ऊर्जा 30 टक्के जास्त असते. वेधशाळेचे अधीक्षक डॉ.राजेंद्र प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, 21 जून रोजी दुपारी 12.28 वाजता सूर्याच्या उभ्या किरणांमुळे सावली अदृश्य होईल. 21 जूननंतर दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच सूर्याची हळूहळू दक्षिणेकडे वाटचाल सुरु होईल. त्यामुळे दिवस हळूहळू लहान होत जातील आणि 23 सप्टेंबर रोजी रात्र आणि दिवस समान असतील. (हेही वाचा: पौर्णिमेला आकाशात दिसला गुलाबी चंद्र, जगाने पाहिले अद्भुत दृश्य; जाणून घ्या खास कारण)

दरम्यान, अनेक देशांमध्ये 21 जूनचा दिवस हा ऋतुबदलाचा दिवस मानला जातो. पश्चिमेतल्या देशांमध्ये 21 जूनच्या दिवशी स्प्रिंग (Spring) म्हणजे वसंत ऋतू संपून उन्हाळा सुरू होतो. नॉर्वे, फिनलंड, ग्रीनलंड, अलास्का आणि उत्तर ध्रुवाजवळ इतर प्रदेशांमध्ये याच सुमारास 'मिडनाईट सन' (Midnight Sun) म्हणजे मध्यरात्रीही सूर्य पहायला मिळतो.