सध्या मानवाला चंद्र (Moon) किंवा मंगळाच्या पृष्ठभागावर चालणे आणि राहणे शक्य नाही. याचे कारण चंद्र आणि मंगळाचे गुरुत्वाकर्षण बल कमी आहे. चंद्र आणि मंगळावर पृथ्वीपेक्षा खूपच कमी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ज्यामुळे चंद्र आणि मंगळावर पोहोचणाऱ्या गोष्टींचे वजन कमी होते, ज्यामुळे मानव चंद्राच्या पृष्ठभागावर तरंगतात. मात्र, आता जपानच्या शास्त्रज्ञांनी यावर उपाय शोधला आहे. आतापर्यंत आपण फक्त चांद्रयान आणि मंगळयानाबद्दल ऐकले होते, पण आता लवकरच पृथ्वीवरून बुलेट ट्रेनमध्ये बसून मानव चंद्र आणि मंगळावर जाऊ शकणार आहेत.
जपान एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे, याअंतर्गत जपान पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बुलेट ट्रेन चालवणार आहे. ही बुलेट ट्रेन आधी चंद्रावर नेण्याची जपानची योजना आहे, ही योजना यशस्वी झाल्यास ती मंगळावरही नेण्याची योजना आहे. जपान चंद्र आणि मंगळावर पृथ्वीसारखे राहण्यायोग्य वातावरण तयार करणार आहे. या प्रकल्पासाठी जपानमधील क्योटो विद्यापीठातील संशोधकांनी काजिमा कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत करार केला आहे.
ही शून्य आणि कमी गुरुत्वाकर्षण वातावरणात मानवी मस्क्यूकोस्केलेटल प्रणाली कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी, पृथ्वीसारख्या वैशिष्ट्यासह 'ग्लास’ निवासस्थानाची रचना विकसित करण्याची योजना आहे. ‘ग्लास’मध्ये पृथ्वीसारखे वातावरण आणि गुरुत्वाकर्षण शक्ती असेल, ज्यामुळे अंतराळात राहणे सोपे होईल. या योजनेअंतर्गत, ग्लास आणि आंतर-ग्रहांच्या गाड्यांचे प्रोटोटाइप करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतील. (हेही वाचा: दिवसेंदिवस वाढत आहे Siberia मधील 'नरकाच्या दरवाजा'चा आकार; जाणून घ्या काय आहे हा रहस्यमयी खड्डा)
यासाठी ‘हेक्सागन स्पेस ट्रॅक सिस्टिम' नावाची वाहतूक व्यवस्था तयार केली जाईल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ही इंटरप्लॅनेटरी स्पेस ट्रेन, पृथ्वी, चंद्र आणि मंगळाच्या दरम्यान प्रवास करताना स्वतःचे गुरुत्वाकर्षण निर्माण करेल. ग्लासच्या आत कृत्रिम गुरुत्वाकर्षण, वाहतूक व्यवस्था, वनस्पती आणि पाणीही उपलब्ध असेल. याद्वारे पृथ्वीवरील सर्व सुविधा अवकाशात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या संरचनेला चंद्रावर 'लुनाग्लास' आणि मंगळावर 'मार्सग्लास' असे नाव असेल. या ग्लासची उंची सुमारे 1300 फूट असेल आणि त्रिज्या 328 फूट असेल.