Rs 1 Crore Zoom Challenge: लॉक डाऊनच्या काळात भारत सरकार देत आहे तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर
Video Conferencing | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्स (Video-Conferencing Apps) जितके सध्याच्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या (Coronavirus Lockdown) काळात वापरले जात आहेत, तितके याआधी कधीच वरापले गेले नव्हते. बरेच व्यावसायिक लोक घरून काम करत असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि कॉलिंग अ‍ॅप्सच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यात झूम अ‍ॅप (Zoom App) बर्‍यापैकी लोकप्रिय झाले आहे. परंतु आता याच्या सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत प्रश्न उभा राहिले आहेत. भारत सरकारने अलीकडेच काही विभाग आणि कर्मचार्‍यांसाठी झूमच्या वापरावर ‘बंदी’ घातली आहे. अशात झूमला पर्याय म्हणून एखादे नवीन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप भारतात तयार व्हावे अशी सरकारची इच्छा आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology) नुकतेच मेक इन इंडिया (Make In India) अभियानांतर्गत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्यूशनच्या विकासासाठी इनोव्हेशन चॅलेंजची घोषणा केली आहे. मेक इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी अधिक चांगले तंत्रज्ञान विकसित करण्याचे हे चॅलेंज आहे. यामध्ये विजयी ठरणारी व्यक्ती किंवा कंपनीला 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

विजेता टीमने तयार केलेले हे व्हिडिओ कॉन्फरन्स अॅप केंद्र आणि राज्य सरकार 1 वर्षासाठी वापरणार आहे. यासाठी कंपनीला अॅप देखभालीसाठी वर्षाकाठी 10 लाख रुपये दिले जाणार आहेत. मेक इन इंडिया प्रोग्रामअंतर्गत हे अॅप केवळ स्टार्ट-अप कंपनी किंवा टीमच बनवू शकते. या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे. तुमची आयडीया 7 मे पर्यंत दिली जाऊ शकते व 29 जुलै, 2020 रोजी विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल.

7 मे नंतर पुढे यातून तीन लोकांची निवड केली जाणार आहे, त्यांना फायनक प्रोजेक्टसाठी प्रत्येकी 20 लाख रुपये दिले जातील. अखेर सर्वोत्कृष्ट उत्पादन असणार्‍या टीमला  विजेता म्हणून घोषित केले जाईल आणि त्यांना 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. (हेही वाचा: Lockdown मुळे लोकप्रिय ठरलेल्या Zoom App च्या युजर्सचा डेटा हॅक; पाच लाखाहून अधिक लोकांची माहिती गेली चोरीला)

या गोष्टी समाविष्ट असाव्यात –

> हे अ‍ॅप सर्व प्रकारचे व्हिडिओ रिझोल्यूशन आणि ऑडिओक्वालिटीला सपोर्ट करणे आवश्यक आहे.

> नेटवर्क स्पीड कमी जास्त होत असतानाही हे अ‍ॅप चालले पाहिजे.

> अ‍ॅपमध्ये ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असावी.

> कॉन्फरन्स कॉल दरम्यान चॅटचा पर्याय असावा.

> अॅपद्वारे स्क्रीन/फाइल-शेअरिंग केले जाऊ शकणे आवश्यक आहे.

> अ‍ॅपने कमी पॉवर/प्रोसेसरवर देखील कार्य केले पाहिजे.

दरम्यान, झूमच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारा एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये या App मधून वापरकर्त्यांची माहिती लीक झाल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 500,000 हून अधिक झूम वापरकर्त्यांचे पासवर्ड आणि उर्वरित खात्याशी संबंधित तपशील एका अगदी कमी किंमतीमध्ये झार्क वेबवर विकले जात आहेत.