Ransomware Attack: तब्बल 91 टक्के भारतीय कंपन्यांना 2022 मध्ये बसला सायबर हल्ल्याचा फटका; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती
Cyber-attack | Representational Image (Photo Credit: PTI)

ग्लोबल आयडेंटिटी सिक्युरिटी कंपनी सायबरआर्कने (CyberArk) केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की, सर्वेक्षण केलेल्या संस्थांपैकी 91 टक्के भारतीय संस्थांनी गेल्या एका वर्षात रॅन्समवेअर हल्ल्यांचा (Ransomware Attacks) अनुभव घेतला आहे. रॅन्समवेअर हल्ले हे असे हल्ले आहेत, ज्यात मालवेअरद्वारे फाइल्सचा अॅक्सेस ब्लॉक केला जातो आणि अॅक्सेस देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली जाते.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, सर्वेक्षण केलेल्या 10 पैकी नऊ जणांनी म्हणजेच 91 टक्के जणांनी (2022 च्या अहवालाच्या तुलनेत 70 टक्के जास्त) मागील वर्षात रॅन्समवेअर हल्ल्याचा अनुभव घेतला आणि प्रभावित झालेल्या जवळपास 55 टक्के संस्थांनी रिकव्हरीसाठी दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा किंमत चुकवली. यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, अशा संस्था कदाचित दुहेरी खंडणीला बळी पडल्या असाव्यात.

सायबरआर्कने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 2022 मध्ये भारतीय संस्थांनी वाढत्या सायबर कर्जाचा अनुभव घेतला, जेथे महामारीच्या काळात सुरक्षा खर्चामुळे व्यापक डिजिटल व्यवसाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक मागे पडली. यंदा आर्थिक मंदी, कर्मचारी कपात, ग्राहकांच्या खर्चात घट आणि अनिश्चित जागतिक वातावरणाचा परिणाम म्हणून सायबर कर्जाची पातळी वाढण्याची अपेक्षा आहे.

अहवालाच्या निष्कर्षांमध्ये, 2023 मध्ये आयडेंटिटी आणि सायबर सुरक्षेच्या आगामी चिंतेबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 61 टक्के सिक्युरिटी प्रोफेशनल्सचा असा विश्वास आहे की, 2023 मध्ये एआयशी निगडीत धोके त्यांच्या संस्थांवर परिणाम करू शकतात. यातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे एआय-पावर्ड मालवेअर. 2023 मध्ये 61 टक्के एआय-सक्षम हल्ले असण्याचा अंदाज आहे. (हेही वाचा: Cyberattack On Microsoft: मायक्रोसॉफ्टची सेवा बंद करण्यामागे सायबर हल्लेखोरांचा हात; कंपनीने केला धक्कादायक खुलासा)

सुमारे 92 टक्के संस्थांना असे वाटते की त्यांच्या सॉफ्टवेअर पुरवठा साखळीमध्ये कोड/मालवेअर इंजेक्शन हे त्यांच्या संस्थांना भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या सुरक्षा धोक्यांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे, 80 टक्के लोक मानतात की, नोकर कपातीमुळेदेखील नवीन सायबर सुरक्षा समस्या निर्माण होऊ शकतात.