JioMart ने व्हॉट्सअ‍ॅपवर सुरु केली Online Shopping ची चाचणी; नवी मुंबई, ठाणे व कल्याण येथे सुविधा उपलब्ध, जाणून घ्या कशी द्यावी ऑर्डर
JioMart (संग्रहित संपादित प्रतिमा)

फेसबुक (Facebook) आणि रिलायन्स जिओने (Reliance Jio) गेल्या आठवड्यात भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या अंतर्गत फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममधील 9.99 टक्के भागभांडवल, 5.7 अब्ज म्हणजेच 43,574 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. या करारानंतर जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअ‍ॅपनेही (WhatsApp) व्यापार भागीदारीचा करार केला. व्हॉट्सअॅप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी असून, रिलायन्स रिटेल अंतर्गत जिओ मार्ट (JioMart) येत असल्याने, आता जिओ मार्टने फेसबुकच्या जिओ प्लॅटफॉर्मवरील कराराचा भाग म्हणून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी रिलायन्स जिओने आपल्या ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) पोर्टची चाचणी सुरू केली आहे. मुंबईच्या (Mumbai) जवळपास 3 ठिकाणी जिओमार्टची चाचणी सुरू करण्यात आली आहे. आता जगभरात लॉकडाऊन दरम्यान, भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणार्‍या 40 दशलक्ष लोकांना जिओमार्टचा एक्सेस मिळणार आहे. खरेदीसाठी जिओ मार्टने एक व्हॉट्सअ‍ॅप नंबरही जारी केला आहे. आपण 8850008000 वर कॉल करून किराणा सामान घरी मागवू शकता. सध्या ही सुविधा काही शहरांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हळूहळू त्याचा विस्तार केला जाईल. सध्या ही सेवा नवी मुंबई, ठाणे (Thane) आणि कल्याण (Kalyan) यासारख्या मुंबईतील काही भागात सुरू करण्यात आली आहे.

मात्र जिओने होम डिलिव्हरीची सुविधा सुरू केलेली नाही. ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकांना किराणा दुकान किंवा जिओ मार्ट स्टोअरमध्ये स्वतः जाऊन वस्तू घ्याव्या लागतील.

अशी द्या ऑर्डर –

> सर्व प्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये जिओ मार्टचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर 8850008000 सेव्ह करा. त्यानंतर त्या नंबरवर ‘hi’ असा मेसेज केल्यावर, जिओमार्टकडून ग्राहकांच्या चॅट विंडोवर एक लिंक पाठवली जाईल, जी केवळ 30 मिनिटांसाठी सक्रिय असेल.

> या लिंकवर क्लिक केल्यानंतर, नवीन पेज उघडेल जिथे ग्राहकाला त्याचा पत्ता आणि फोन नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल. आवश्यक तपशील भरल्यानंतर जिओ मार्ट ग्राहकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्याजवळ असलेल्या वस्तूंची यादी पाठवेल.

> ग्राहक त्या वस्तूंच्या सूचीतून हव्या त्या वस्तू निवडून ऑर्डर पाठवेल. यानंतर ग्राहकांच्या सामानाचा तपशील जिओ मार्ट किंवा जवळील किराणा दुकानांवर पाठविला जाईल. (हेही वाचा: Reliance-Facebook Deal: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्सने फेसबुक आणि विविध कंपन्यांसोबत आतापर्यंत केलेले महत्त्वाचे व्यवहार)

> शेवटी, ग्राहकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर असे किराणा दुकान किंवा जिओ मार्ट स्टोअरची माहिती पाठवली जाईल, जिथे ग्राहकाची ऑर्डर पाठविली गेली आहे. यामध्ये ग्राहक किती दिवसांत ऑर्डर घेऊ शकतो हे देखील नमूद केले असेल.

ग्राहक त्यावेळी, त्या दुकानात जाऊन आपली ऑर्डर घेऊ शकतो. दरम्यान, रिलायन्स कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, मात्र कंपनीने सुमारे 1200 किराणा दुकानांसोबत काम सुरू केले असल्याची माहिती आहे.